पुणे : शहरातील जुन्या वाड्यांचा प्रश्न जटील होत चालला आहे. या विषयावर सरकारने धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. सरकारने याकडे लक्ष द्यावे व काही घरमालक-भाडेकरू यांना दिलासा द्यावा अशी मागणी आमदार रविंद्र धंगेकर यांनी विधानसभा अधिवेशनात केली.
बहुसंख्य जुने वाडे धोकादायक स्थितीत आहेत. घरमालक- भाडेकरू वाद आहेत. सरकारचे कठीण नियम, महापालिकेची नियमावली, तिथून होणारी अडवणूक यातून शहरात अनेक नागरिक धोकादायक स्थितीत राहतात. पावसाळा आला की हा धोका वाढतो. सरकारनेच या लक्ष घालून हा प्रश्न कायमचा सोडवण्याची गरज आहे. त्यासाठी तज्ञांची समिती नियुक्त करून अडचणीचे नियम काढून टाकावेत, काही नियम सुरक्षेच्या दृष्टीकोनातून नव्याने करावे असे धंगेकर यांनी सांगितले.
पुण्यातील पूरग्रस्त वसाहतीत अनेकांनी गरजेपोटी बांधकाम केले. अशा घरांना तीन पट प्रॉपर्टी टॅक्स लावण्यात आला आहे. हा अन्यायकारक कर रद्द झाला पाहिजे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत झालेल्या अवैध बांधकामाचा शास्ती कर शासनाने माफ केला. त्या धर्तीवर पूरग्रस्त भागातील नागरिकांचाही कर रद्द व्हावा, अशीही मागणी त्यांनी सरकारकडे केली. पुणे शहराच्या विविध प्रश्नांवर त्यांनी अधिवेशनात भाष्य करत तो सोडवण्याची मागणी केली.