पुणे : शहरातील प्रमुख पीएमपी स्थानकांच्या परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. विशेषत: हे चाेरटे गर्दीच्या मार्गावरील बसमध्ये शिरून महिला प्रवाशांकडील ऐवज लांबवत आहेत. त्यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनेत प्रवासी महिलांकडील सोन्याचे दागिने, रोकड असा दोन लाख २३ हजारांचा ऐवज लांबविल्याचे समोर आले आहे.
याबाबत प्रणाली गाडगे (वय २६, रा. राजगुरूनगर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रणाली या भोसरी ते हडपसर मार्गावरील पीएमपी बसने प्रवास करत होत्या. बसमध्ये गर्दी होती. चोरट्याने प्रणाली यांच्याकडील पिशवीतून दीड लाख रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र, ८०० रुपयांची रोकड असा एक लाख ५१ हजारांचा ऐवज लांबविला. त्या बसमधून हडपसर पीएमपी स्थानकात उतरल्या असता, त्यांच्या पिशवीतून मंगळसूत्र तसेच रोकड चोरीला गेल्याचे लक्षात आले. पोलीस उपनिरीक्षक एस. जी. थोरात तपास करत आहेत.
दुसऱ्या एका घटनेत ज्येष्ठ महिलेच्या हातातील ७० हजारांची सोन्याची बांगडी चोरट्यांनी लांबविली. तक्रारदार ज्येष्ठ महिला कोथरुड भागात राहायला आहेत. स्वारगेट पीएमपी स्थानकातून त्या बसमधून प्रवास करत होत्या. टिळक रस्त्यावरील पूरम चौकातील थांब्यावर त्या उतरल्या. चोरट्यांनी ज्येष्ठ महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी लांबविली. महिलेने याबाबत स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, सहायक निरीक्षक बाचवे तपास करत आहेत.