पुणे : श्रावण महिना सुरू झाला आहे. खिचडी, भगर अशा उपवासाच्या पदार्थांना मागणी वाढली आहे. साबुदाण्याचे दर स्थिर असले, तरी भगरीच्या दरात वाढ झाली आहे. मागणी वाढल्याने भावही वाढल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. साबुदाणा ४८ ते ५३ रुपये प्रतिकिलो, तर भगर १०० ते ११५ रुपये किलो आहे. साबुदाण्याच्या जास्त सेवनाने पित्त, डोकेदुखी, अपचन असे त्रासही होतात. त्यामुळे उपवासाचे पदार्थ काळजीपूर्वक निवडावेत, असा सल्ला दिला जात आहे.
श्रावण महिना हा व्रतवैकल्ये, पूजा, उपवासांचा महिना असतो. श्रावणी सोमवार, शनिवारी अनेक जण उपवास करतात. त्यामुळे या महिन्यात उपवासाच्या पदार्थांना जास्त मागणी असते. साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याचे वडे, थालिपीठ अशा पदार्थांवर अक्षरश: ताव मारला जातो. मात्र, आरोग्याच्या दृष्टीने साबुदाणा पचायला जड आणि पित्त वाढवणारा असतो. भगरीमुळेही पित्त वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे उपवासाच्या दिवशी शक्यतो फळांवर भर द्यावा, असे सांगितले जात आहे.
--------------------
उपवासाच्या पदार्थांचे दर :
भगर - ११० ते ११५ रुपये
साबुदाणा - ४८ ते ५०
नायलॉन साबुदाणा - ५२ ते ५४ रुपये
------------------
साबुदाण्याला गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी अजून तरी कमी मागणी आहे. साबुदाण्याचे दरही वाढलेले नाहीत. भगरीच्या दरात मात्र वाढ झाली आहे. आपल्याकडे साबुदाणा तामिळनाडूमधील सिलम जिल्ह्यातून येतो.
- अशोक लोढा, व्यापारी
---------------------------
उपवासाचा अर्थच पचनसंस्थेला एक दिवस विश्रांती देणे असा असतो. मात्र, बहुतांश लोक उपवासाच्या पदार्थांवर ताव मारतात. परिणामी, दुसऱ्या दिवशी तब्येतीच्या तक्रारी उद्भवतात. त्यामुळे उपवासाच्या दिवशी फळे, शहाळ्याचे पाणी अशा पदार्थांवर भर द्यावा. शक्यतो तेलकट, तुपकट पदार्थ टाळावेत.
- हेमांगी साने, आहारतज्ज्ञ