पुणे : महापालिकेकडून ७०० आयटी कंपन्यांच्या मालकांना मिळकतकरामधून मोठी सूट दिली जात असतानाच सर्वसामान्य नागरिकांचा कर थकल्यानंतर मात्र त्यावर चक्रवाढ व्याज लावून लूट केली जात आहे.महापालिकेमध्ये एका गरीब महिलेचा १९०० रुपये मिळकतकर गेल्या ८ वर्षांपासून थकला होता. त्यावर चक्रवाढ दराने व्याजआकारणी होऊन तो दीड लाख रुपयांपर्यंत वाढला. शास्तीकराच्या नावाखाली थकलेल्या मिळकतकराच्या व्याजावरील व्याज आकारले जात आहे. ब्रिटिश काळामध्ये अशा प्रकारचा लगान वसूल करण्याची पद्धत होती, तीच महापालिकेमध्येही अवलंबली जात आहे, अशी टीका उपमहापौर आबा बागुल यांनी केली आहे. याविरोधात ठराव आणणार असल्याचे त्यांनी सांगितले. डॉलरमध्ये कोट्यवधी रुपये कमाविणाऱ्या आयटी कंपन्यांना मात्र मिळकतकरातून मोठी सूट दिली जात आहे. शहरामध्ये ८५८ आयटी कंपन्या आहेत, त्यापैकी ७०० कंपन्यांना निवासी दराने मिळकतकराची आकारणी होत आहे. केवळ १५८ कंपन्यांकडून व्यावसायिक दराने मिळकतकर वसूल केला जात आहे. उर्वरित ७०० कंपन्यांनाही व्यावसायिक दर लागू केल्यास महापालिकेला कोट्यवधी रुपयांचा मिळकतकर मिळू शकणार आहे. याबाबत मुख्यमंत्री, राज्यपाल, महापालिकेचे आयुक्त यांच्याकडे वारंवार पत्र पाठवून पाठपुरावा करीत असल्याचे आबा बागुल यांनी सांगितले. निवासी दराने करआकारणी करूनही आयटी कंपन्यांकडे ३२ कोटी ९९ लाख ६३ हजार रुपयांची थकबाकी आहे. तसेच मोबाइल कंपन्यांनी ७२ कोटी ३७ लाख रुपयांचा कर थकविलेला आहे. या धनधांडग्यांकडे एवढी थकबाकी असताना शास्तीकराच्या नावाखाली मात्र सर्वसामान्यांची लूट केली जात आहे. दर वर्षी अडीचशे कोटी रुपये शास्तीकरापोटी गोळा केले जातात. (प्रतिनिधी)
‘आयटी’ला कोट्यवधींची सूट, सर्वसामान्यांची मात्र लूट
By admin | Published: February 10, 2015 1:31 AM