"इंधन दरवाढीबाबत जनतेच्या मनातली खदखद केंद्राच्या बहिऱ्या कानांपर्यंत पोहोचवणारच"
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 05:21 PM2021-07-13T17:21:54+5:302021-07-13T17:22:13+5:30
पुण्यात विधानसभा काँग्रेस कमिटीच्या वतीने इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने
हडपसर: "बहुत हुई महंगाई कि मार, बस भी करो मोदी सरकार, पेट्रोल डिझेल दरवाढ रद्द झालीच पाहिजे," अशा घोषणां देत पुण्यातील हडपसर भागात विधानसभा काँग्रेस कमिटीच्या वतीने इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. जनतेच्या मनातली खदखद काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केंद्राच्या बहिऱ्या कानांपर्यंत पोहोचवल्याशिवाय काँग्रेस कार्यकर्ता शांत बसणार नाही. असे आक्रमक मत शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी यावेळी व्यक्त केले.
केंद्र सरकारने केलेल्या इंधन दरवाढ, घरगुती गॅससह इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत झालेली भरमसाट वाढी विरोधात आज हडपसर काँग्रेसच्या वतीने विधानसभा अध्यक्ष प्रा. शोएब शफी इनामदार यांच्या नेतृत्वाखाली सायकल रॅली काढून निषेधही व्यक्त करण्यात आला. महागाई व बेरोजगारीच्या मुद्द्यावर हडपसर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत जोरदार घोषणाबाजी करत शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या उपस्थितीत इंधन दरवाढीविरोधात सह्यांच्या मोहिमेस सुरवात केली आहे.
इंधन दरवाढीने कामगार, शेतकऱ्यांसह सर्व जनतेच्या मनात आक्रोश आहे. सर्वसामान्यांचे आर्थिक कंबरडे मोडून त्यांना वेठीस धरणाऱ्या मोदी सरकारला जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. असे मत बागवे यांनी मांडले. तर जनतेच्या मनातली खदखद काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केंद्राच्या बहिऱ्या कानांपर्यंत पोहोचवल्याशिवाय काँग्रेस कार्यकर्ता शांत बसणार नाही असेही ते म्हणाले.