पुणे : आमच्या हातात सहकारातील निवडणुका पुढे ढकलणं होतं. ते आम्ही केले. आम्हालाही अनेकदा वाटतं की आत्ता निवडणुका लागायला नको होत्या. थोड्या उशिरा किंवा कोरोना कमी झाल्यानंतर झाल्या असत्या तरी चाललं असतं. पण आता पंढरपूर आणि मंगळवेढ्यात काही झालं तर आम्ही जबाबदार असणार आहोत. कारण निवडणूक आयोगाने निवडणुका लावल्या आहेत. आणि आम्ही उमेदवार उभा केला म्हटल्यावर प्रचार तर करणारच आहे. निवडणुका लावल्यावर घरातुन तर प्रचार होऊ शकत नाही, असे रोखठोक मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले आहे. पंढरपूर आणि मंगळवेढा येथील पोटनिवडणुक होत आहे. तिथे राष्ट्रवादी आणि भाजप यांच्याकडून जोरदार प्रचार सुरु आहे. या प्रचारामध्ये भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या तोफा डागल्या जात आहेत. याच दरम्यान भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी हे महाविकास आघाडी सरकार बदलण्याची जबाबदारी माझ्यावर सोडा असे वक्तव्य केले होते. त्याला राष्ट्रवादीचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ''महाविकास आघाडी सरकारला बोटाच्या नखाएवढाही धक्का लागणार नाही. हे सरकार स्थिर आहे"अशा शब्दात जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
पुण्यात कोरोना आढावा बैठकीनंतर अजित पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. पवार म्हणाले, राजकीय मी बोलत नाही. केंद्राने व्हॅक्सिन एक्सपोर्ट करायची गरज नव्हती. रेमडेसिविर निर्यातीची गरज नव्हती. पण असं म्हणलं की मी राजकीय बोलतो अशी टिका करणार असाही टोला पवार यांनी यावेळी लगावला.
ससूनमधील निवासी डॉक्टरांच्या संपावर भाष्य करताना अजित पवार म्हणाले,ससूनच्या निवासी डॉक्टरांना सध्या देशावर कोरोनाचे मोठे संकट आहे. तुमचे रास्त मुद्दे नक्की ऐकून घेऊ, पण तुम्ही जर ऐकलं नाही तर काही कडक पावलं उचलावी लागतील.
ससूनमधील निवासी डॉक्टरांनी परिस्थितीची भान ठेवून टोकाची भूमिका न घेता सहकार्य करण्याची मानसिकता ठेवावी. तसेच कोण पक्ष काय म्हणतो याला महत्व नसतं. तर शहराच्या हिताचे काय हे पाहुन निर्णय घेतो असेही पवार म्हणाले.