चाकण : कोरेगाव खुर्द (ता. खेड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकाची चारचाकी गाडीची सफाई करण्यासाठी शाळेतीलच विद्यार्थ्यांना पाणी मारून धुऊन आणि त्यानंतर कापडी फडक्याने पुसून चकाचक करून घेतली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी इंदिरा अस्वार व गटशिक्षण अधिकारी सोपानराव वेताळ यांनी या प्रकाराविषयी सर्व माहिती घेऊन तत्काळ कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. कोरेगाव खुर्द गावच्या परिसरात ठाकरवाडीत पहिली ते सातवीपर्यंत जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. या शाळेत शिक्षण घेणारे बहुतांश विद्यार्थी आदिवासी ठाकर समाजाचे आणि गरीब शेतकरी कुटुंबातील असून, शाळेतील विद्यार्थी पटसंख्यादेखील चांगली आहे. अभ्यास करायचे सोडून एक विद्यार्थी चारचाकी गाडीवर पाणी मारून धूत होता, तर दुसरा विद्यार्थी कापडी फडक्याने गाडी पुसून चकाचक करीत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या वेळी गाडी धुणाºया विद्यार्थ्यांना विचारले असता, आम्हाला सरांनी गाडी धुवायला लावली असल्याचे त्यांनी सांगितले. संबंधित गाडी शाळेच्या मुख्याध्यापकांची असल्याचे समजले.या शाळेत आदिवासी ठाकर समाजाच्या विद्यार्थ्यांची पटसंख्या जास्त आहे. येथील शिक्षक विद्यार्थ्यांकडून नेहमीच काही ना कामे करून घेत असल्याचेही येथील विद्यार्थ्यांनी सांगितले. मागील काही दिवसांपूर्वी जांभळे आणण्यासाठी विद्यार्थ्यांना सांगितले होते. तसेच या शाळेत येणारा पोषण आहार येथील स्वस्त धान्य दुकानात येतो, त्यानंतर तो पोषण आहाराचा माल विद्यार्थ्यांकडून डोक्यावर वाहून आणला जात असल्याचेही अनेक नागरिकांनी सांगितले. आज सकाळी मुलांना शाळेच्या आवारातील झाडांना पाणी सोडण्यासाठी विद्यार्थ्यांना सांगितले होते. पाणी सोडताना पाणी गाडीवर उडाले, ते पाणी विद्यार्थ्यांनी पुसले, मी कधीही गाडीची सफाई करण्यासाठी सांगत नाही. उलट विद्यार्थ्यांच्या प्रगतीकडे माझे विशेष लक्ष असते, असे स्पष्टीकरण मुख्याध्यापक तुकाराम कदम यांनी दिले.आदिवासी समाज शिक्षणापासून वंचित राहू नये, याकरिता शासन लाखो रुपये खर्च करत आहे. यातून चांगले व हुशार विद्यार्थी घडला जाऊन, आदिवासी लोकांमध्ये आधुनिकता यावी, हा एकमेव उद्देश आहे. परंतु शाळेतील शिक्षकांकडून ज्ञानदानाचे काम न करता स्वत:ची कामे करण्यासाठी विद्यार्थ्यांचा वापर करत आहेत.या प्रकाराबाबत गटविकास अधिकारी इंदिरा अस्वार यांना विचारले असता लवकरच सर्व वस्तुस्थिती पाहून दोषी असणाºयांवर तत्काळ कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. याबाबत गटशिक्षण अधिकारी सोपानराव वेताळ यांना विचारले असता, असे काम विद्यार्थ्यांना करायला लावायला नाही पाहिजे, असा प्रकार चुकीचा आहे, असे त्यांनी सांगितले.
मुख्याध्यापकाच्या दिमतीला जुंपले विद्यार्थी, चारचाकी धुऊन घेत असल्याचे उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 11:51 PM