पुणे : शाळा सुरू करण्यासाठी काही संस्थाचालक व पालक आग्रह करत आहेत. परंतु दिवाळीपूर्वी शाळा सुरू करण्यास टास्क फोर्सचा विरोध आहे, तर १८ वर्षांवरील ज्या विद्यार्थ्यांचे, त्यांना शिकविणारे प्राध्यापक, काॅलेजमधील इतर कर्मचारी यांचे लसीकरण पूर्ण झाले असेल, ते काॅलेज सुरू करण्यात हरकत नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे सांगितले.
पुण्यातील कोरोना आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरली असून, बहुतेक सर्व गोष्टी सुरू झाल्या आहेत, मग राज्यातील शाळा सुरू होणार का असा प्रश्न पत्रकारांनी विचारला, यावर पवार म्हणाले, राज्यात कोरोनाचे रुग्ण कमी होत आहे ही वस्तुस्थिती असली तरी सरसकट शाळा सुरू करणे कठीण आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील ज्या दहा जिल्ह्यांमध्ये सध्या कोरोनाचा एकही रुग्ण नाही अशा जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याचा विचार होऊ शकतो. टास्क फोर्स व तज्ज्ञांच्या मते राज्यात अद्याप ही लसीकरणाचा मोठा टप्पा गाठायचा आहे. राज्यातील आणि जिल्ह्यात पहिला डोस घेतलेल्या लोकांची संख्या अधिक असली तरी अद्याप दुसरा डोस घेतलेल्या लोकांची संख्या कमीच आहे. यामुळेच शाळा सुरू करण्यासंदर्भात टास्क फोर्सचे मत लक्षात घेऊनच राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्रीच अंतिम निर्णय घेतील, असे स्पष्ट मत अजित पवार यांनी येथे व्यक्त केले.
-----