पुणे : प्रत्येक थोर व्यक्तिमत्त्वाने शून्यातून विश्व निर्माण केले आहे. प्रामाणिकपणे अभ्यास आणि काम केले तर यश नक्कीच मिळते. जीवनात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी शॉर्टकटने नाही, तर राजमार्गाने वाटचाल करावी. शॉर्टकटने मिळवलेले यश थोड्या काळासाठी असते. चिरकाल टिकणाऱ्या यशाच्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी वाटचाल करायला हवी, असे मत सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी व्यक्त केले.
कॅम्प हायस्कूलमधील गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने शिक्षण घेता यावे, यासाठी केअरटेकर सोसायटीच्यावतीने ३० विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीसाठी दत्तक घेण्यात आले. यावेळी ते बोलत होते. पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्षा प्रियांका श्रीगिरी,नगरसेवक दिलीप गिरमकर, कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे संचालक वालचंद संचेती, डॉ. अशोक काळे, अश्विनी मेहंदळे दाबके, केअरटेकर संस्थेचे कुमार शिंदे, रणजित परदेशी, विजय सोनवणे, छब्बु अक्का जाधव, कपिल कल्याणी, पवन देडगावकर यावेळी उपस्थित होते.
दिलीप कांबळे म्हणाले, ‘समाजात अनेक गरजू आणि होतकरू विद्यार्थी आहेत. अनेक विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींमुळे शिक्षण घेता येत नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी समाजातील लोकांनी पुढे यायलाहवे.’