पुणे : माहेरुन बुलेट घेण्यासाठी पैसे आणावेत, यासाठी आयटी इंजिनिअरने आपल्या पत्नीचा छळ केल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी वानवडी पोलिसांनी आयटी इंजिनिअर व अन्य पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़
याप्रकरणी २८ वर्षांच्या महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विक्रम सर्जेराव गाडे (वय ३५, रा. मंहमदवाडी) व इतर पाच जणांवर कौटुंबिक छळ, फसवणूक विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेचे नुकतेच लग्न झाले आहे. विक्रम गाडे हा मुंबई येथे आयटी कंपनीत नोकरीला आहे. गाडे हा मंहमदवाडी परिसरात कुटुंबासह राहतो. आठवड्यातून दोन दिवस तो पुण्यात घरी येतो. विक्रमला बुलेट घ्यायची असल्यामुळे त्याने व त्याच्या कुटुंबियांनी विवाहितेला माहेरून पैसे घेऊन येण्यास सांगितले. पण, त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यावरून त्यांनी तिचा मानसिक व शारिरीक छळ करण्यास सुरूवात केली. तसेच, विक्रम गाडे याने तिच्याशी विवाह करताना खोटी माहिती दिली. आरोपीचे वय कमी असल्याचे तसेच पतीला आजार असल्याचे त्याच्या कुटुंबियांनी लपवून ठेवले. विवाहानंतर हा प्रकार समजला. त्यानंतर आरोपींनी त्यांना त्रास देण्यास सुरूवात केली. त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी वानवडी पोलिस तपास करत आहेत.