पुणे : देशाची राजधानी दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात घडत असलेल्या गुन्ह्यांच्या तुलनेत पुणे, मुंबई सारख्या शहरातील वाढती लोकसंख्या, वेगाने होत असलेले शहरीकरण, प्रसार माध्यमांचे असलेले लक्ष यामुळे 2016 या वर्षांत गुन्ह्यांच्या प्रमाणातही अल्पशी घट झाली असली तरी दुर्लक्षणीय नाही. आयटी क्षेत्र व सायबर तसेच बालक महिलाविषयक गुन्ह्यांमध्ये ही नागपूर, पुणे, मुंबई यांत गुन्ह्यांची संख्या वाढत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.गेल्या २०१५ पर्यंत गुन्ह्यांमधील दोषसिद्धीचे कमी असलेले प्रमाण व जमिनींच्या वाढत्या भावातून आलेला पैसा व त्यातून गुंडगिरी याचेच हे कटू फळ आहे, असे म्हणावे लागेल. पुण्यासारख्या शहरांतील सत्ताधारी पक्षांच्या राजकीय नेतृत्वाने गुंडांसाठी लाल गालीचा अंथरल्याने त्याचा हा परिपाक आहे. काही प्रामाणिक वृत्तीच्या पोलीस अधिकाऱ्यांनी चांगले काम करूनही कमी मनुष्यबळाने त्यांच्या कार्यपद्धतीला मर्यादा येत असल्याने या शहरातील गुन्हेगारी वाढत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस व सामाजिक यंत्रणा यांच्याकडून समन्वयासाठी एकत्रितपणे प्रयत्न होणे अत्यावश्यक आहे, असे मत शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या आ. डॉ. गोऱ्हे यांनी आज व्यक्त केले आहे.राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या अहवालात महाराष्ट्र गुन्ह्यांच्या एकंदर नोंदीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. यावर आपले अभ्यासपूर्ण विवेचन आ. डॉ. गोऱ्हे यांनी आज दिले आहे. त्या म्हणाल्या, एकट्या दिल्ली शहरात १३,७७७ महिलाविषयक गुन्हे घडले असल्याने ही बाब चिंताजनक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. देशातल्या प्रमुख २० महानगरांच्या तुलनेत ३९ टक्के गुन्हे एकट्या दिल्लीमध्ये आहेत. त्याचवेळी महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपुरात पुणे व मुंबईच्या तुलनेत अधिक प्रमाणात व देशात आठव्या क्रमांकावर गुन्हेगारी घडत असल्याची बाब अत्यंत चिंताजनक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. त्या म्हणतात, राज्याच्या ग्रामीण व शहरी भागात पण महिलाविषयक गुन्ह्यांची हाताळणी संवेदनशील पद्धतीने न होणे, हे गुन्हे हाताळताना संवेदनशीलता पाळली जाते किंवा नाही हे देखरेख करणारी व तपासण्याची सक्षम यंत्रणाही उपलब्ध नाही ही आजही भेडसावणारी मोठी समस्या आहे. यावर प्रभावीपणे काम होणे अत्यंत आवश्यक आहे.मुंबईच्या तुलनेत पुणे, नागपूर ही शहरे गुन्ह्यांमध्ये पुढे आहेत. याची कारणमीमांसा देताना त्या म्हणाल्या, या दोन्ही शहरांच्या परिसरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात झालेली जमिनीच्या भावातील वाढ, त्यातून आलेली चंगळवादी प्रवृत्ती, गुंडगिरी, बेकायदा शस्त्रे वापरण्याच्या प्रमाणात अचानक झालेली वाढ प्रामुख्याने कारणीभूत आहे.
वाढत्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर पोलीस व सामाजिक यंत्रणा यांच्याकडून समन्वयाकरिता एकत्रितपणे प्रयत्न होणे अत्यावश्यक : आ. डॉ. नीलम गोऱ्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2017 10:24 PM