पुणे : समाज आज जातींकडून वर्गाकडे वळत आहे. मराठा समाजाचे मोर्चे म्हणजे परंपरेने मिळालेला धंदा आम्हाला नको, आम्हाला आरक्षण हवे आहे, अशी मानसिकता सांगणे आहे. याचाच अर्थ जात आता नाहीशी होत चालली आहे. हे चांगलेच लक्षण आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. कुमार सप्तर्षी यांनी आज येथे केले.कै. चंद्रनाथ भगवानदीन शर्मा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे सप्तर्षी यांच्यासह प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ एस. के. जैन, कवयित्री प्रतिभा शाहू मोडक, पत्रकार अभिनंदन थोरात, वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. मुख्तार देशमुख यांचा चंद्रनाथ शर्मा स्मृती पुरस्कार देऊन रविवारी सत्कार करण्यात आला. कौटुंबिक न्यायालयाचे निवृत्त प्रमुख न्यायाधीश वि. वा. शहापूरकर यांच्या हस्ते सप्तर्षी यांचा, माजी कुलगुरु डॉ. शं. ना. नवलगुंदकर यांच्या हस्ते जैन व मोडक व आमदार विजय काळे यांच्या हस्ते थोरात व देशमुख यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. पुणेरी पगडी, शाल, स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ असे पारितोषिकाचे स्वरूप होते. त्या वेळी सप्तर्षी बोलत होते. शर्मा ट्रस्टच्या प्रमुख विश्वस्त मालती शर्मा, नंदकिशोर जकातदार, नेहा व राकेश शर्मा व्यासपीठावर होते. ब्रिटिशकाळात न्यायदानासाठी असलेल्या पद्धतीत चंद्रनाथ भगवानदीन शर्मा हे प्रमुख ज्युरी म्हणून काम पाहत असत. त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कन्या अॅड. मालती शर्मा यांनी ट्रस्ट स्थापला आहे.जातीच्या सीमारेषा द्वेषाशिवाय राहू शकत नाहीत, असे सांगून सप्तर्षी यांनी मराठ्यांच्या आरक्षणासाठी मोर्चे निघत असताना थोडेसे अराजक होईल, तरु णांमध्ये आपण जातींमुळे गोंधळ होईल असे करू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली.अध्यक्षपदावरून बोलताना डॉ. नवलगुंदकर म्हणाले, की पुरस्कार हा व्यक्तीचा नसतो. त्या व्यक्तीमधील गुणात्मकतेचा असतो. जैन सत्काराला उत्तर देताना म्हणाले, की काम हाच आपला छंद असला पाहिजे. आपण लोकांच्या किती उपयोगी पडतो, हे पाहावयास हवे.प्रतिभा मोडक यांनी मालती शर्मा यांचा त्यांच्या कार्याबद्दल गौरव केला. माणूस हीच एकमेव जात असते, असे सांगून सिक्कीममधील ताज्या भेटीत जवानांनी आपल्या हातचे लाडू खाणे हा अविस्मरणीय अनुभव असल्याची आठवण नमूद केली. कार्यक्रमाचा प्रारंभ सुधीर पौडवाल यांच्या बासरीवादनाने झाला. मालती शर्मा यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. वडिलांच्या न्यायविषयक कार्याची माहिती सांगितली. पुरस्कारार्थींचा परिचय जकातदार यांनी करून दिला. नेहा शर्मा यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)वकिलांनीच भ्रष्टाचार संपवावा ४देशावर महात्मा गांधी यांच्यापासून अरुण जेटलींपर्यंत अनेक वकिलांनीच राज्य केले आहे, असे सांगून निवृत्त न्यायाधीश वि. वा. शहापूरकर यांनी सद्य:स्थितीबाबत चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, की समन्स काढण्यापासून अनेक कामांसाठी पैसे द्यावे लागतात. न्यायालयात चालणारा भ्रष्टाचार वकिलांनीच पुढाकार घेऊन संपविला पाहिजे.निवडणुकांसाठी पैसा येतो कोठून ४जातींवर, पैशांवर लढविल्या जाणाऱ्या निवडणुका धोकादायक असतात, असे आमदार विजय काळे यांनी सांगितले. ते म्हणाले, की निवडणुकीत घालवलेला कोट्यवधींचा पैसा भ्रष्ट मार्गांनी परत मिळवला जातो. हा पैसा कोठून येतो हे तपासले पाहिजे. जो समाजाचे निर्णय करणार आहे असा लोकप्रतिनिधी कसा आहे, याचा विचार जनतेने केला पाहिजे.
जात नाहीशी होतेय हे चांगलेच
By admin | Published: October 10, 2016 2:07 AM