पुणे : समाजातील संवाद आता फारच कमी होत असताना वाद हा मोठ्या प्रमाणात वाढत आहे वादाबरोबरच सवांदही वाढणे फार महत्त्वाचे आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त स.प. महाविद्यालयाने आयोजित केलेल्या ‘लोकमान्य टिळक’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. या वेळी महाविद्यालयाच्या वादसभेच्या वार्षिक कार्यक्रमांचे औपचारिक पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. तसेच सदानंद मोरे यांच्या हस्ते अभ्यासाव्यतिरिक्त कला, क्रीडा, व अन्य क्षेत्रांतील उत्तम कामगिरीबद्दल महाविद्यालयातील आणि वादसभेतील यशस्वी विद्यार्थ्यांना गौरवचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या वेळी प्राचार्य दिलीप शेठ, वादसभा प्रमुख प्रा. दीपक कर्वे, प्रा. अनुजा राजमाचीकर, प्रा. वैजयंती बेलसरे आदी उपस्थित होते.सदानंद मोरे म्हणाले, ‘‘लोकमान्य टिळक हे वादप्रिय व्यक्ती होते. त्यांनी आयुष्यात वादविवादाबरोबरच संवादालाही महत्त्व दिले होते. पूर्वीच्या काळी वादपरंपरा असल्याने माणसाची विचार करण्याची पद्धत वाद, प्रतिवाद आणि सवांद या घटकांत मोडली जात होती; पण आता संवादाचे महत्त्व कमी होत आहे. टिळक सशस्त्र क्रांतीचा पाठपुरावा करीत नव्हते. ते परिस्थतीचा अंदाज घेऊन प्रत्येक गोष्टीचे नियोजन करीत असत. राजकारणात त्या काळी टिळकांनी अनेक बदल घडवून आणले. आधुनिक काळात कामगार ही शक्ती निर्माण होत आहे; पण त्या काळी कामगार चळवळीची पहिली सुरुवात टिळकांनी केली, तर त्यांच्या मृत्यूनंतर एका महिन्यात कामगार संघटनेच्या अधिवेशनाला सुरुवात झाली होती. भारतात कामगार चळवळ जास्त काळ टिकली नाही, कारण जातींचे आणि ऐतिहासिक युतींचे प्रश्न पुढे येत होते. टिळकांनी समाजाला एकत्र आणण्यासाठी धार्मिक गोष्टींचा मोठ्या प्रमाणावर वापर केला. स्वराज्याच्या आड कुठलीही गोष्ट आली तरी मी थांबणार नाही, असे स्वातंत्र्यध्येय टिळकांनी त्या काळी ठेवले होते.’’
समाजात संवाद वाढवणे महत्त्वाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2017 3:18 AM