लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सर्व सदनिका ज्या जागेवर आहेत, ती जागा सोसायटीच्या नावावर होणे तिथे राहणाऱ्या सभासदांसाठी महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी केले. जगातील सर्वाधिक आनंदी अशी ओळख झालेल्या पुणे शहरासाठी तर ही महत्त्वाचीच गोष्ट आहे, असे ते म्हणाले.
मुक्तछंद व मातोश्री रमाबाई आंबेडकर प्रतिष्ठान यांच्या वतीने माजी आमदार मेथा कुलकर्णी यांनी कोथरूडमधील सोसायट्यांसाठी या मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन शुक्रवारी केले होते. कवडे यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन झाले.
जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था दिग्विजय राठोड यांनी सोसायटीची जागा नावावर करून घेण्याच्या कायदेशीर कार्यवाहीची (मानीव अभिहस्तांतरण) सविस्तर माहिती दिली. सरकारी विशेष मोहीम १ ते १५ जानेवारी अशी होती. मात्र, हे काम त्यानंतरही करता येऊ शकतो. त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात, संस्थेचे कोणते पदाधिकारी उपस्थित लागतात, याविषयी त्यांनी सांगितले. उपस्थित सह.संस्थांच्या सभासद, पदाधिकारी यांनी विचारलेल्या शंका, उपस्थित केलेले प्रश्न यांची सविस्तर माहितीही त्यांनी दिली.
मेधा कुलकर्णी यांनी प्रास्तविक केले. पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था फेडरेशनचे सुहास पटवर्धन, नवनाथ अनपट भोसले, आशुतोष परदेशी, प्रमाणित लेखापरीक्षक अरुण महाजन, नितीन देव, संतोष धारणे, रवींद्र नेर्लेकर, तसेच कोथरूडमधील सहकारी सोसायट्यांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.