लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “प्रत्येक व्यक्ती महत्त्वाची असते हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांची प्रतिष्ठा जपली पाहिजे. महाविद्यालयातील प्रत्येक घटकाच्या वर्तनात विद्यार्थ्यांबद्दल आस्था व स्नेह असणे गरजेचे आहे. प्रत्येक विद्यार्थ्याकडे शिक्षणाबरोबरच त्याचे आकलन, दृष्टिकोन, पार्श्वभूमी असे सांस्कृतिक भांडवल असते. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची महाविद्यालये ही जबाबदारी निश्चितच पार पाडतील,” असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांनी सांगितले.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयात बांधलेल्या नवीन अमृतमहोत्सवी इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. ‘मएसो’चे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. ‘मएसो’चे उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे व प्रदीप नाईक, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे, नियामक मंडळाचे सदस्य डॉ. संतोष देशपांडे, ‘मएसो’चे सचिव डॉ. भरत व्हनकटे, सहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. बी. बुचडे, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य प्रा. जी. आर. धनवडे आदी या वेळी उपस्थित होते.
डॉ. उमराणी म्हणाले की, “गरवारे महाविद्यालयातील नव्या इमारतीचे उद्घाटन करताना शिक्षक आणि प्रकुलगुरू अशा दोन्ही भूमिकांतून आनंद होत आहे. ‘ऑक्स्फर्ड ऑफ द ईस्ट’ अशी ख्याती असलेल्या पुण्यात ‘मएसो’ ने शैक्षणिक क्षेत्रात टोलेजंग काम केले आहे. मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सचा प्राचार्य या नात्याने त्या कामात योगदान देण्याची संधी मला मिळाली याचे मला भान आहे. या नव्या प्रतिभासंपन्न वास्तूत कर्तबगार नागरिक, शिक्षक, शास्त्रज्ञ, धोरणकर्ते घडतील.”
एअर मार्शल गोखले (निवृत्त) म्हणाले, “महाविद्यालये सुरू होतील तेव्हा विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने हाताळायचे याचा विचार आत्ताच केला पाहिजे. आंतरराष्ट्रीय नागरिक घडवण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे.” प्राचार्य डॉ. बुचडे यांनी स्वागत केले. सहस्रबुद्धे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. संतोष देशपांडे यांनी आभार मानले. डॉ. वर्षा तोडमल यांनी सूत्रसंचालन केले.