पुणे : सर्वात कमी काळ मुख्यमंत्री राहण्याचा येडियुरप्पा यांचा विक्रम देशातील कोणताही मुख्यमंत्री कधीही मोडू शकणार नाही, याबाबतीत भारतीय जनता पार्टी आघाडीवर आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मंगळवारी केली.पक्षाचा वर्धापन दिन तसेच हल्ला बोल आंदोलनाच्या आढावा बैठकीनिमित्त पुण्यात आलेल्या पवार यांनी पत्रकारांशी बोलताना भाजपावर हल्लाबोल करीत स्वपक्षाच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचेही कान टोचले. ते म्हणाले, कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. तरीही त्यांनी सत्तेसाठी दावा केला. त्यानंतर बहुमत सिद्ध करण्यासाठी लोकशाहीला मान्य नसणारे प्रयत्न केले. सर्वोच्च न्यायालयाने त्यांची कानउघाडणी केली. आता तरी त्यांनी सत्तेचा गैरवापर करू नये.केंद्र व राज्य सरकारला नागरी हिताच्या अनेक गोष्टींमध्ये अपयश आले आहे. त्यांच्याविरोधात जनमत तयार होत आहे. हा आवाज वाढवण्यासाठी म्हणून पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने, पदाधिकाºयाने आंदोलनात सहभाग दिला पाहिजे. आपापल्या कार्यक्षेत्रात जनतेला सरकारच्या बेजबाबदारपणाची जाणीव आंदोलनांमधून करून दिली पाहिजे. पक्षाने यासाठी व्यापक कार्यक्रम जाहीर केला आहे. १० जूनला पक्षाची मोठी बैठक पुण्यात होणार आहे. त्यात सरकारच्या विरोधात रणशिंग फुंकले जाईल. त्यासाठी सर्वांनी तयार व्हावे, असेही पवार यांनी सांगितले. पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची भेट घेतली. त्यांची प्रकृती बरी आहे. पक्षाच्या १० जूनच्या मेळाव्याला ते उपस्थित राहणार असून त्यात ते भाषणही करतील, त्यांनी सांगितले.
सर्वात कमी काळ मुख्यमंत्री राहण्याचा येडियुरप्पांचा विक्रम मोडणे अशक्य!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 1:13 AM