सोमेश्वरनगर : एफआरपीची रक्कम एकत्रित देणे अशक्य असल्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत स्पष्ट केले. किरकोळ शाब्दिक चकमक वगळता सभा शांततेत पार पडली. साखर कारखानदारीपुढील आव्हाने, येणारा गळीत हंगाम तसेच साखर उताऱ्यातील घसरणीवर या सभेत चर्चा झाली. या वेळी शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे, कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, माजी अध्यक्ष शहाजी काकडे, शिवाजीराव भोसले, प्रमोद काकडे, रामचंद्र भगत, सतीश खोमणे, बी. जी. काकडे, माजी आमदार चंदूकाका जगताप, प्रा. दिगंबर दुर्गाडे, संभाजी होळकर आदी उपस्थित होते. जगताप म्हणाले, ‘‘येणाऱ्या हंगामात कारखान्याला १० लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध आहे. धरणात पाणी कमी आहे; त्यामुळे सभासदांचा लवकरात लवकर ऊस संपविणे संचालक मंडळापुढे आव्हान आहे. मागील वर्षी उसाला आतापर्यंत २,०१५ रुपये अदा केले आहेत. उर्वरित २४२ रुपये आपण लवकरच देणार आहोत; मात्र हे करीत असताना साखरेला हमीभाव नाही, हे कारखान्यांचे दुखणे आहे. त्यामुळे एकरकमी एफआरपी देणे अशक्य बाब आहे.’’सभेच्या सुरुवातीला प्रमोद काकडे यांनी एकाच सभेच्या दोन विषयपत्रिका कशा, याबाबत संचालक मंडळाला जाब विचारला. तसेच, पोस्टाच्या ठेवीच्या पावत्यांवर एका सभासदाला २०० ते २५० रुपयांचा तोटा झाला आहे. याला जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई करा, अशी मागणी केली. यावर अध्यक्ष जगताप यांनी आपली अगोदर विषयपत्रिका छापली होती; मात्र नंतर साखर संघाच्या सूचनेनुसार त्यामध्ये तीन विषय वाढवून पुन्हा छापली, असे सांगितले. गेल्या वर्षीची एफआरपी जर २,१३६ रुपये होती, तर मग १०० रुपये दिलेले कशाचे, याचा खुलासा की, ते पैसे नेमके कशाचे होते? कारखान्याला ‘ब’ वर्ग प्राप्त झाला आहे. यावरून कारखान्याची प्रगती समजत आहे. मदन काकडे यांनी कोजन व बगॅस व साखर उतारा पडला आहे तो कसा सुधारता येईल, याबाबत सभागृहाला मार्गदर्शन केले. अजय कदम, राहुल चव्हाण, वैभव कोंडे, जयवंत होळकर, बाळासाहेब जगताप, भाऊसाहेब भोसले, ज्योतीराम जाधव यांनी विविध प्रश्रांबाबत संचालकांना विचारणा केली. कारखान्याच्या वतीने कार्यकारी संचालक सुरेश तावरे, फायनान्स मॅनेजर बाळासाहेब कदम, कार्यालयीन अधीक्षक सुभाष धुमाळ, शेतकी अधिकारी सोमनाथ बेलपत्रे यांनी सभासदांच्या प्रश्नांचे निरसन केले. उत्तम धुमाळ यांनी आभार मानले.
एफआरपीची रक्कम एकत्रित देणे अशक्य
By admin | Published: October 01, 2015 12:55 AM