पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुण्याला जुलैपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे, त्यामुळे आता जिल्ह्यातील इतर तालुक्यांसाठी धरणातून शहराच्या वाट्याचे पाणी सोडणे शक्य नसल्याचे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी सोमवारी स्पष्ट केले.महापालिकेच्या मुख्यसभेत शहराच्या पाणीप्रश्नावर नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या मुद्यांना जगताप यांनी उत्तर दिले. त्यांनी सांगितले, ‘‘पुण्याच्या धरणांमध्ये दर वर्षी आॅगस्टअखेर २८ टीएमसी इतका पाणीसाठा असायचा. चालू वर्षी तो १४.५ टीएमसी इतकाच होता. सध्या धरणांमध्ये ५.५ टीएमसी पाणीसाठा आहे, शहराला जुलैपर्यंत साडेतीन टीएमसी पाणी लागणार आहे. मात्र, बाष्पीभवन व इतर बाबींचा विचार करून या धरणांमधून इतर कोणालाही शहराच्या वाट्याचे पाणी देणे शक्य नाही. इतरांना पाणी दिले, तर शहराला जुलैपर्यंत पाणी पुरू शकणार नाही.’’बांधकाम व इतर वापरांसाठी पिण्याचे पाणी वापरू नये, जीपीएस टँकरला बसविणे, लिकेज कमी करणे आदी लघुकालीन उपाययोजना प्रशासनाकडून केल्या जात आहेत. त्याचबरोबर पर्वती ते लष्कर जलकेंद्रापर्यंत बंद पाइपलाइनचे काम हाती घेतले जाणार आहे. ग्रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे, २४ बाय ७ अंतर्गत मीटर योजना राबविणे आदी दीर्घकालीन उपाययोजना राबविल्या जाणार असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले. महापौर प्रशांत जगताप म्हणाले, ‘‘पुणेकरांनी त्यांच्या वाट्याचे ५० टक्के पाणी वापरले आहे व इतर तालुक्यांना ७५ टक्के पाणी दिले आहे. त्यामुळे आता पुणेकरांवर जास्तीची पाणीकपात लादता येणार नाही. दौंड, इंदापूरच्या हक्काचा ०.४२ पाणीसाठा आहे, तो त्यांना देण्यात यावा. मुळशीचे पाणी पुणे व पिंपरी-चिंचवडकरांना मिळावे यासाठी राज्यशासनाने पुढाकार घ्यावा.’’सभागृह नेते बंडू केमसे म्हणाले, ‘‘महापौर तुम्ही पुणेकरांच्या बाजूने घेतलेल्या निर्णयाबदद्ल तुमचे अभिनंदन. पालकमंत्री तुम्ही पुण्याचेच पालकमंंत्री आहात ना, असे मला तुम्हाला विचारायचे आहे.’’विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे म्हणाले, ‘‘पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार एक दिवसाआड पाणीपुरवठा मान्य केला. तरी ते दौंड, इंदापूरसाठी पाणी मागत आहेत, याचे आश्चर्य वाटते. नगरसेवकांना सातत्याने पाण्यासाठी झगडावे लागत आहे. साडेसतरा टीएमसी पाणी आपण वर्षभरात शेतीला देतो आहोत. या परिस्थितीत पालकमंत्री आमच्यावर सूड उगवित आहेत का, असे वाटत आहेत. अतिरिक्त पाणी देण्यास आमचा विरोध नाही.’’ (प्रतिनिधी)
जिल्ह्यासाठी पाणी सोडणे अशक्य
By admin | Published: April 26, 2016 1:31 AM