पुणे: मूलतत्त्ववादी आणि धर्मांध लोक प्रत्येक समाजात असतात; मग तो समाज हिंदू असो वा मुस्लीम. अशा प्रतिगामी विचारधारेच्या मूठभर लोकांमुळे संपूर्ण देशाचे नुकसान होते. अशा लोकांचे मुळीच समर्थन होऊ शकत नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तबलिगींनी ज्या प्रकारे गैरवर्तन केले, त्याचे समर्थन मी मुळीच करणार नाही. पण म्हणून काही वेड्या लोकांच्या चुकीपायी संपूर्ण मुस्लीम समाजाला वेठीस धरणंही चुकीचं आहे.
दुर्देवाने आपल्या देशात काही लोक धार्मिकतेच्या मुद्द्यावर दुही माजवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण यामुळे देश काही उद्ध्वस्त होणार नाही. कारण भारत देशाने अशा अनेक संकटांशी याआधी दोन हात केले आहेत. हा देश बर्याचदा हादरला, डगमगला पण मोडला कधीच नाही. आपणही कोरोनाच्या या संकटातून सहीसलामत बाहेर येऊच, असा मला विश्वास वाटतो. अशा शब्दांत ख्यातकीर्त गीतकार व साहित्यिक जावेद अख्तर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
मंजुल पब्लिशिंग हाउसने आयोजित केलेल्या दास्तान-ए-शायरी या इन्स्टाग्राम लाइव्ह कार्यक्रमात ते बोलत होते. अरविंद मंडलोइ यांनी त्यांच्याशी संवाद साधला. जो बात कहने से डरते है सब वो बात तू लिख, ये देश ऐसा नही था यांसारख्या शायरी व नज्म यांनी ही ऑनलाइन मैफल रंगली. भारतभरातून अनेक जण या मैफलीत सामील झाले होते. अख्तर पुढे म्हणाले की, डॉक्टर्स, नर्सेस आपला जीव धोक्यात घालून ही लढाई लढत आहेत; पण काही धर्मांध लोक त्यांच्यावर हल्ला करत आहेत, ही खरंच चिंताजनक आणि अस्वस्थ करणारी बाब आहे.
स्वतःवर संकट ओढवल्यावर ज्या मंदिर, मशीदीकडे लोक धावतात, आज त्याच धर्मस्थळांना टाळे लावायची वेळ आली आहे. प्रत्येक देश स्वतःला महासत्ता बनवण्याच्या नादात स्वतःच्या देशातील आरोग्यव्यवस्थेकडे अक्षम्य दुर्लक्ष करत आहे. अद्ययावत शस्त्रात्रे निर्मितीत गुंग झालेला अमेरिकेसारखा बलाढ्य देशही याच चुकीमुळे आज गुडघे टेकू टाकला आहे. तळागाळातल्या लोकांच्या प्राथमिक गरजा भागवण्यात, त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यात आणि त्यांचा किमान विकास साधण्यात आपला देश आजही अपयशीच ठरला आहे. जिथे निर्भयपणे व्यक्त होता येत नाही, ती लोकशाही सदोष असते आणि अशा यंत्रणेचा फटका नेहमी सर्वसामान्यांनाच बसतो.
भविष्यात आपल्या देशाला अशा आपत्तींसाठी आधीपासूनच तयारी करायला हवी. बेरोजगारी, गरीबी, टोकाची विषमता आणि सदोष आरोग्ययंत्रणा अशी अनेक आव्हानं समोर असताना धार्मिक तणावांना बळी पडलो तर आपला देश कित्येक वर्षे मागे जाईल. कोरोनाच्या आपत्तीमुळे कला, साहित्य आणि चित्रपट क्षेत्रालाही फटका बसला असून इथून पुढच्या काळात होणार्या अभिव्यक्ती व आविष्कारांतही याचं प्रतिबिंब उमटेल असंही ते म्हणाले.