"मराठा समाजाच्या लोकांची माथी भडकवणे इतकाच नेत्यांचा उद्देश आहे का?" राज ठाकरेंचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2021 01:28 PM2021-07-11T13:28:51+5:302021-07-11T13:29:31+5:30
मराठा आरक्षणाच्या मुद्दयावरून राज ठाकरे यांनी राजकीय पक्षांना टोला लगावला
पुणे: मराठा आरक्षणाच्या मोर्चाला भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस सर्व नेते या मोर्चाला गेले होते. मराठा आरक्षण सर्वांना मान्य आहे, मग नेमकं अडलंय कुठं. मराठा समाजाच्या लोकांची माथी भडकवणे इतकाच नेत्यांचा उद्देश आहे का? असा सवाल उपस्थित करत मराठा आरक्षणाच्या मुद्दयावरून राज ठाकरे यांनी राजकीय पक्षांना टोला लगावला आहे.
पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी राज ठाकरे यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. राज ठाकरे दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर आहेत.
ओबीसी आरक्षणाचा मुद्दाही सर्वांना मान्य आहे. ते रद्द केलं गेलंय. केंद्रातील आणि राज्यातील दोन्ही सरकारांना मान्य आहेत, तर अडतंय कुठं. कोर्टामध्ये तुमची बाजू प्रभावीपणे मांडली का जात नाहीये? सर्वांना एकदा व्यासपीठावर आणा, त्यांना विचारा तुम्हा सर्वांना हे मान्य आहे का? असंही ठाकरे यावेळी म्हणाले आहेत.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोल यांनी 'एकला चलो'चा नारा दिला होता. तसेच पाठीत खंजीर खुपसण्यात आल्याचं वक्तव्य केलं होतं. यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, सध्या कोण एकमेकांचे शत्रू किंवा मित्र झाले आहेत हेच कळत नाहीये. नेते आज काय बोलतील आणि उद्या काय बोलतील हे सांगता येत नाही.
मराठा आरक्षणावरुन केंद्र सरकार आणि राज्य सरकार एकमेकांवर ढकला-ढकली
मराठा आरक्षणावरुन केंद्र सरकार आणि राज्य सरकार एकमेकांवर ढकला-ढकली करत आहे. हे लोकांनी पाहणं गरजेचं आहे. राजकीय नेत्यांना या प्रश्नांनी उत्तरं विचारली गेली पाहिजे. तुम्हा सर्वांचे या मुद्द्यावर एकमत आहे, तर मग नेमकं घोडं पेंड कुठं खातंय. नेते केवळ मतदानासाठी लोकांकडे जातात आणि निवडणूक झालं की तोंड फिरवलं जातं, असा करुन चालणार नाही. लोकांनी राजकीय नेत्यांना जाब विचारायला हवा. असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.