पुणे : शिवसेना नेत्या दिपाली सय्यद पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजप नेत्यांकडून दीपाली सय्यद त्यांच्यावर निशाणा साधला जातोय. तर भाजप महिला आघाडीच्या नेत्या उमा खापरे यांनी धमकी स्वरूपात त्यांना इशारा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजपाच्या इतर नेत्यांबाबत वक्तव्यं केलं तर घऱात घुसून बदडून काढू असं त्या म्हणाल्या आहेत. त्यावर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी भाजपच्या महिला आघाडीला ट्विटरच्या माध्यमातून सडेतोड उत्तर दिले आहे. ''घरात घुसून मारण्याची धमकी देणाऱ्यांना ते आल्यावर पळून पळून मारायचे बरं'' असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे. रुपाली पाटील म्हणाल्या, दीपाली ताई सय्यद, तुम्हाला घरात घुसून मारण्याची धमकी देणाऱ्यांना ते आल्यावर पळून पळून मारायचे बरं. यांचा तो बाळ्या, लोकांचे ते कार्टे ही भूमिका नाही चालणार भाजप भगिनींनो रावणाच्या बहिणीने अन्याय केला. म्हणूनच शूर्पणखाचे नाक कापले होतेच की तसेच यांना पळून पळून मारायचे असा इशारा पाटील यांनी दिला आहे.
भाजपा महिला आघाडीच्या नेत्या उमा खापरे यांनी घरात घुसून चोप देऊ, असे म्हटले आहे. त्यानंतर दिपाली सय्यद यांनीही त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाला काही किंमत नाही का? अशी विचारणा केली आहे. तसेच माझ्या घरी येऊन दाखवा, असे आव्हानही भाजपच्या महिला आघाडीच्या नेत्यांना दिले आहे.
उमा खापरे यांचा इशारा
“फक्त प्रसिद्धीसाठी वक्तव्यं केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत बोललो तर लगेच प्रसिद्धी मिळेल हे त्यांना माहिती आहे. पण यानंतर त्या बाईने पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजपाच्या इतर नेत्यांबाबत वक्तव्यं केलं तर घऱात घुसून बदडून काढू. आम्ही गप्प बसणार नाही,” असा इशारा भाजपा नेत्या उमा खापरे यांनी दिला आहे.
तुम्ही काय माझ्या घरात घुसणार आहात? तेवढी तुमची ताकद आहे का
सुरुवात तुम्ही करायची आणि आम्ही काही बोललो की आम्ही वाईट होणार. जसे तुमच्यासाठी पंतप्रधान महत्वाचे आहेत तसे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. मुख्यमंत्र्यांचा दर्जा नाही का? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाला काही किंमत नाही का? तुम्ही काहीही बोलायचं, उचलली जीभ लावली टाळ्याला हे बरोबर आहे का? काय करायचं ते करा…येताय ना माझ्या घऱी, पाहतेच मी, असे आव्हान दिपाली सय्यद यांनी दिले. तुम्ही काय माझ्या घरात घुसणार आहात? तेवढी तुमची ताकद आहे का बघा, असा खोचक टोलाही त्यांनी भाजपाला लगावला आहे