पुणे - राज्याचं लक्ष लागलेल्या पुण्यातील कसबा पेठ पोटनिवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. सध्या हाती आलेल्या निवडणूक निकालानुसार दुपारी ११ वाजेपर्यंत काँग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी ८ हजारांहून अधिक आघाडी घेतली आहे. त्यामुळे, येथील मतदारसंघात काँग्रेसचा विजय निश्चित मानला जात आहे. धंगेकर समर्थकांनी गुलाल उधळत जल्लोषही सुरु केला आहे. तर, स्वत: रविंद्र धंगेकर यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला असून यापुढेही ही आघाडी कायम राहिल, असे त्यांनी म्हटलंय. तर, भाजपा उमेदवार हेमंत रासने यांनी पराभव मान्यच केल्याचं दिसून येतं.
सध्याच्या आकडेवारीनुसार हेमंत रासने यांनी माध्यमांशी बोलताना प्रांजळ कबुली दिली. मी बुथवाईज आकडेवारी पाहिल, त्यानंतर, सर्व गोष्टीचं बारकाईनं विश्लेषण करील. मात्र, मी कुठे कमी पडलो ते मी पाहिन, मला आत्मचिंतन करावं लागेल, अशी प्रतिक्रिया भाजपचे कबसा पेठ मतदारसंघातील उमेदवार हेमंत रासने यांनी दिली. पक्षाने मला उमेदवारी दिली, माझ्यावर विश्वास दर्शवला, सर्व यंत्रणा माझ्यासाठी काम करत होती. मात्र, केवळ मी उमेदवार म्हणून कमी पडलो, जो निकाल लागला तो मी स्विकार करतो, असेही त्यांनी म्हटलंय.
कसबा पेठेत पहिल्यांच निवडणूक वन टू वन झाली, दुरंगी निवडणूक झाली. यापूर्वीच्या निवडणुकांचा अभ्यास केल्यास, मोठ्या प्रमाणात बहुरंगी निवडणूक झाली आहे. अनेक उमेदवार रिंगणात होते. पण, यंदा थेट दोघांमध्ये निवडणूक झाल्यानेही पराभवाचा सामना करावा लागला असेल, असेही रासने यांनी म्हटले.
रविंद्र धंगेकर आघाडी
मविआच्या रविंद्र धंगेकरांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेतली आहे.मतमोजणीच्या आठव्या फेरीपर्यंत मविआ उमेदवार रविंद्र धंगेकरांना ३० हजार ४६९ मते मिळाली होती. तर भाजपच्या हेमंत रासने यांना २७ हजार १७३ मते मिळाली होती. तर नवव्या फेरीनंतर धंगेकरांना मोठी आघाडी घेतली. नवव्या फेरीत धंगेकरांनी ४ हजार ७०० मतांची आघाडी घेतली होती. कसबा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जात होता. तिथे पहिल्या फेरीपासून रविंद्र धंगेकर आघाडीवर असल्याचे दिसत आहेत.