पुणे : हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचा उल्लेख करताना स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज केला होता. त्यावरून महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. संभाजी महाराजांचा उल्लेख धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज करावा अशी मागणी करत भाजपने अजित पवारांवर टीका केली आहे. मात्र अजित पवार आपल्या मतावर ठाम असल्याचे त्यांनी सांगितलं आहे. आज छत्रपती संभाजी महाराज यांचा ३४३ वा राज्याभिषेक सोहळा दिन आहे. या निमित्तानं राज्यात विविध कार्यंक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
त्यातच पुण्यात राष्ट्रवादीकडून बँनरबाजी सुरु झाली आहे. "स्वराज्य रक्षक संभाजी महाराज "असे बॅनर पु्ण्यात राष्ट्रवादीनं लावले आहेत. संभाजी महाराजांच्या राज्यभिषेक सोहळा दिनानिमित्त ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते, खासदार अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "संभाजी महाराज यांचा इतिहास पुढे घेऊन जाणे महत्त्वाचं आहे.यात राजकारण करू नये. असं कोल्हे यावेळी म्हणाले आहेत. पुण्यात डेक्कन येथे संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी कोल्हे आले होते. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
संभाजी महाराज यांचा इतिहास पुढे घेऊन जाणे महत्त्वाचं आहे. यात राजकारण करू नये. छत्रपती संभाजी महाराज यांचे विचार सगळ्यापर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे, त्यांचे विचार मलिन करण्याचा प्रयत्न झाला होता. स्वराज्य रक्षक ही संकल्पना व्यापक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.
पुण्यातील डेक्कन येथील संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आलेल्या विश्व हिंदू मराठा परिषदेने धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज नगर पुणे असा बोर्ड पुतळ्यासमोर लावला आहे. फुलांनी धर्मवीर असं लिहून अभिवादन केले आहे.