मंचर (पुणे) : कार्यकर्त्यांनी आता गहाळ राहता कामा नये. आपल्याला सदैव उपलब्ध राहणारा खासदार हवा आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी कार्यकर्त्यांनी झटून कामाला लागावे. आढळराव पाटील यांची घरवापसी झाली आहे. मालिकांमध्ये काम करण्यापेक्षा जनतेमध्ये घाम गाळणे अवघड असल्याची टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर केली.
माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आपल्या समर्थकांसह मंचर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. त्यावेळी झालेल्या मेळाव्यामध्ये अजित पवार बोलत होते. पवार म्हणाले, लोकसभेची निवडणूक देशाचे धोरण ठरवणारी निवडणूक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी या भागातून आपल्या विचाराचा खासदार निवडून येणे गरजेचे आहे. शिरूर लोकसभेसाठी महायुतीचे शिवाजीराव आढळराव पाटील हे उमेदवार आहेत. कार्यकर्त्यांनी भावनिक होऊ नये. समोरचा उमेदवार लवकर कामाला लागला आहे. तो डायलॉगबाजी करण्यात वस्ताद आहे. चित्रपट, मालिकेत काम करणे ठीक आहे मात्र जनतेसमोर घाम गाळावा लागतो. आढळराव पाटील यांनी मागील वीस वर्षे मतदारसंघासाठी भरीव काम केल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
सत्तेत सहभागी होऊन आम्ही चूक केली नाही. विकासाच्या मागे उभे राहिलो मात्र विचारधारा सोडली नाही. असेही त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचा मानसन्मान ठेवला जाईल, असेही ते म्हणाले.