वंचितला 'मविआ'मध्ये घ्यावं हे माझं मत, तसं झाल्यास पुढची निवडणूक एकतर्फीच; अजितदादांनी मांडलं 'गणित'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2023 12:59 PM2023-02-03T12:59:09+5:302023-02-03T12:59:53+5:30
वंचित बहुजन आघाडीला मानणारा मोठा वर्ग असल्याने एकत्र लढले तर महाराष्ट्रात वेगळं चित्र निर्माण होईल
पुणे : उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा केली. दोन्ही नेत्यांनी संयुक्तरित्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली होती. हि युती फक्त शिवसेनेबरोबर असल्याचे काँग्रेस व इतर पक्षांनी सांगितले होते. परंतु व्यक्तीगत युती असली तरी प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीचा घटक व्हावा अशी इच्छा उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर आता विरोधी पक्षनेते अजित पवारांनी महाविकास आघाडीत वंचित यावी ही माझी वैयत्तिक इच्छा असल्याचे सांगितले आहे. तसं झाल्यास पुढची निवडणूक एकतर्फीच होईल असंही ते यावेळी म्हणाले आहेत. बाणेर येथे लोकमत आयोजित मुलाखतीत ते बोलत होते. संपादक संजय आवटे यांनी त्यांची मुलाखत घेतली.
पवार म्हणाले, प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेने त्यांच्यासोबत आघाडी केली आहे. महविकास आघाडी टिकावी आणि त्यात बेरीज होण्याकरता जे असतील त्यांनी यावं. अनेक जणांनी प्रयत्न करावे. वंचित बहुजन आघाडीला मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे एकत्र लढले तर महाराष्ट्रात वेगळं चित्र निर्माण होईल. महाविकास आघाडीत वंचित यावी ही माझी वैयत्तिक इच्छा आहे. वरिष्ठ आणि पक्ष काय तो निर्णय घेईल. महविकास आघाडीत एकत्रित बोलत असताना कुणाचा अपमान होणार नाही याची जबाबदारी सर्वांनी घ्यायला हवी.
शरद पवार आमच्याबरोबर येतील, प्रकाश आंबेडकरांची अपेक्षा
वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना यांच्या युतीमुळे निवडणुकांमध्ये आता बदलाचं वातावरण सुरू होणार आहे. गेली अनेक वर्षे उपेक्षितांचं राजकारण अशी चळवळ अमलात आणण्याचा प्रयत्न आमचा होता. पण आमच्याच मित्र पक्षाने ही चळवळ गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला किंवा मर्यादित करण्याचा प्रयत्न केला. शरद पवार आणि आमचं भांडण जुनं आहे. पण ते आमच्याबरोबर येतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती.