पुणे : आयुष्यात नापास होणे ही खूप वाईट गोष्ट नाही. नापास झाल्यानंतर आपण काही तरी इतर करू शकतो. आजपर्यंत जे काही नवीन शोध लागले ते असेच कोणत्या तरी गोष्टीत ‘फेल’ झाल्याने लागले आहेत. त्यामुळे पालकांनी आपली मुले नापास झाली तर त्यावर रागवू नये, असा सल्ला नोबेल पुरस्कार विजेते व जैवविज्ञान शास्त्रज्ञ सर रिचर्ड जॉन रॉबर्ट्स यांनी दिला.
शिक्षण प्रसारक मंडळी, पुणे यांच्या वतीने स. प. महाविद्यालयात ‘नोबेल पुरस्काराचा मार्ग’ या विषयावर मंगळवारी (दि.२०) त्यांचे व्याख्यान आयोजित केले होते. या वेळी शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष ॲड. एस. के. जैन आदी उपस्थित होते. याप्रसंगी रॉबर्ट्स यांनी आपल्या लहानपणापासून ते नोबेलपर्यंतचा प्रवास उलगडून सांगितला.
रॉबर्ट्स म्हणाले, आजपर्यंत अनेकांना नोबेल पारितोषिक मिळाले आहे. कोणीही पारितोषिकासाठी काम केले नाही. ते जे करत होते, त्यात ‘फेल’ झाले आणि नवीन काही तरी त्यांच्यासमोर आले. त्यातूनच नवनवे संशोधन जगासमोर उलगडले. त्यामुळे ‘फेल’ झालात तरी देखील तुम्ही काही तरी मिळवलेले असते.’’
‘‘सध्या जगभरात संशोधनावर अनेक कंपन्या, लॅब कार्यरत आहेत. त्यामध्ये व्यवसायिक आल्याने संशोधनाला अडथळा निर्माण होतो. कारण केवळ पैसा कमविणे हे ध्येय ठेवले तर मग संशोधनावर गुंतवणूक होत नाही. अधिकाधिक चांगले संशोधन करण्यासाठी पैशांची गरज असते. नफा हवा असेल तर मग संशोधनाकडे दुर्लक्ष केले जाते. आज बऱ्याच कंपन्या याकडेच अधिक लक्ष देत आहेत. हे अत्यंत अयोग्य असल्याचे राॅबर्ट्स यांनी सांगितले.
सध्या जीएमओ हे एक तंत्रज्ञान पिक पध्दतीसाठी वापरले जात आहे. जीएमपासून वनस्पती तयार केली जात आहे. लोकसंख्या प्रचंड वाढल्याने आणि हवामान बदल झाल्याने आतापासून आपल्याला समस्या निर्माण होत आहेत. परंतु, पारंपरिक पध्दतीने वाण किंवा वनस्पती वाढवणे आवश्यक आहेच, तसेच जीएमपासून देखील चांगले काही होत असेल तर ते पहायला हवे, अशी अपेक्षा राॅबर्ट्स यांनी व्यक्त केली.