पुणे : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर रुग्णांच्या जीवापेक्षा पैशांना प्राधान्य दिल्याचा आरोप करण्यात आला. डॉ सुश्रुत घैसास यांनी तनिषा भिसे यांच्या कुटुंबियांकडून १० ते २० लाख मागितल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. त्यामुळे महिलेला घेऊन दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जावे लागले. त्याठिकाणी महिलेचा जीव गेला. या प्रकरणावरून घैसास यांच्यावर टीका होऊ लागली होती. त्यानंतर घैसास यांनी राजीनामाही दिला होता. आता या प्रकरणात इंडियन मेडिकल असोसिएशन डॉ घैसास यांच्या पाठीशी असल्याचे दिसून आले आहे. आयएमएचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ संतोष कदम यांनी स्पष्टीकरण देताना ऍडमिट करून घेत असताना लागणारा खर्च महिलेच्या कुटुंबासमोर ठेवला. त्यामुळे घैसास यांची कुठे या प्रकरणात चूक नसताना त्यांनी आपलं काम योग्य पद्धतीने केले असल्याचे सांगितले आहे.
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने नोटीस पाठवल्यावर त्या चौकशीमध्ये घैसास निर्दोष म्हणून सिद्ध होतील. या सगळ्या प्रकरणात शासन जरी चूक कोणाची हे जरी अहवालाचा अभ्यास करून समोर आणणार असले तरी इंडियन मेडिकल असोसिएशन डॉ. घैसास यांच्या सोबत असल्याचे आयएमएने सांगितले आहे. या प्रकरणात डॉ. घैसास यांची चूक नसून त्यांना दोषी ठरवणे चूक असून इंडियन मेडिकल असोसिएशनने त्यांची बाजू मांडली आहे.
कदम म्हणाले, डॉ घैसास यांनी गर्भवती महिलेला योग्य उपचार दिले होते. शिवाय ते देत असताना काही सूचनाही वेळोवेळी केल्या होत्या. महिलेला गर्भधारणा रिस्क असल्याचे त्यांनी सांगितले होते. तसेच तुम्ही मुलं दत्तक घेण्याचा विचार करावा असा पर्यायही घैसास यांनी सुचवला होता. मात्र महिलेने अथवा त्यांच्या कुटुंबीयांनी हे ऐकले नाही. डॉक्टरांचे न ऐकता काही निर्णय संबंधित महिलेने आणि त्यांच्या कुटुंबीयांनी घेतले. जेव्हा महिलेची प्रकृती सिरीयस झाली तेव्हा सुद्धा घैसास यांनी महिलेला मदत करण्याची तयारी दर्शवली होती.
डॉ. घैसास यांच्यावर पैसे मागितल्याचा जो आरोप होत आहे. त्यावर आमचा आक्षेप आहे. कौन्सिलने जरी त्यांना नोटीस पाठवली असली तरी चौकशीमध्ये ते निर्दोष म्हणून सुटतील. आम्ही महाराष्ट्र आयएमएच्या सर्व डॉक्टरांनी घैसास यांना पूर्णपणे पाठिंबा दर्शवला असून त्यांच्या पाठीशी असल्याचे कदम यांनी यावेळी सांगितले आहे.