म्हातारपणी पवार साहेबांसारख्याला बोलून, वागवून त्रास देणे ही महाराष्ट्राची परंपरा नाही - नाना पटोले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 07:08 PM2023-08-23T19:08:26+5:302023-08-23T19:09:28+5:30
सर्वसामान्य लोकांना लुटणारे सगळे डाकू एकत्र अर्थात सत्तेच्या एकाच पिंजऱ्यात आले
राजगुरुनगर: ज्याला पी ए चा मंत्री केला तो टोचुन बोलतो. पुतण्या संन्यास घ्यायला सांगतो. तर बीट विकणाऱ्याला खासदार केला तो टीकात्मक पुस्तक लिहिण्याची भाषा करतो. म्हातारपणी पवार साहेबांसारख्याला असे बोलुन, वागवून त्रास देणे ही महाराष्ट्राची परंपरा, संस्कुती नाही. अशी सणसणीत टीका नाना पटोले यांनी केली.
चाकण येथे शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी पटोले खेड तालुक्यात आले होते. आंदोलन पार पडल्या नंतर राजगुरूनगर येथे हुतात्मा राजगुरू स्मृती शिल्प येथील हुतात्म्यांना पटोले यांनी अभिवादन केले. दरम्यान राजगुरूनगर सहकारी बँकेला त्यांनी भेट दिली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधत करताना परखड मते मांडत त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या मंत्र्यांवर टीका केली.
सर्वसामान्य लोकांना लुटणारे सगळे डाकू एकत्र अर्थात सत्तेच्या एकाच पिंजऱ्यात आले आहेत. काँग्रेसचे सरकार आल्यावर त्यांची एकाच वेळी तुरुंगात रवानगी करायला सोपे होणार आहे. ज्यांच्या विरोधात भ्रष्टाचारी म्हणून टीका केली त्यांनाच पक्षात घेऊन मंत्री केले. खरे तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतःच भ्रष्टाचारी आहेत. याशिवाय शरद पवार यांच्या बाबतीत बोलताना पटोले यांनी प्रफुल्ल पटेल, अजित पवार आणि वळसे पाटलांवर एकाच वेळी टिका केली.