औरंगजेबाच्या औलादी शोधणे गृहमंत्र्यांचेच काम; अत्याधुनिक साधनांचा वापर करावा, पुण्यातून काँग्रेसचे मत
By राजू इनामदार | Published: June 9, 2023 05:04 PM2023-06-09T17:04:13+5:302023-06-09T17:04:23+5:30
राज्यातील विविध शहरांमध्ये मोर्चे निघतात, त्यात एखाद्या समाजावर आरोप केले जातात, यामुळे सामाजिक वातावरण बिघडते
पुणे: औरंगजेबाच्या औलादी अचानक आल्याच कशा? असा प्रश्न गृहमंत्रीच करत असतील तर जनतेने काय करायचे? अत्याधुनिक साधनांचा वापर करा व शंका आहे तर त्यांचा शोध घ्या असे आवाहन काँग्रेसने सरकारला केला. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सरकारची आहे. गृहखाते त्यासाठीच आहे. औरंगजेबाच्या औलादी एकदम कशा आल्या असा प्रश्न दंगलींच्या संदर्भात गृहमंत्र्यांनी केला, पण याच काय कोणत्याही गुन्ह्याचा शोध घेण्याचे काम गृहखात्याचेच आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापक करून गृहमंत्र्यांनी याचा शोध घ्यावा असे काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी म्हणाले.
राज्यातील विविध शहरांमध्ये मोर्चे निघत आहेत, त्यात एखाद्या समाजावर आरोप केले जात आहेत, यामुळे सामाजिक वातावरण बिघडत चालले आहे. याला जबाबदार कोण आहे याचाही गृहखात्याने विचार करावा. विशिष्ट विचारांना खतपाणी मिळेल असे सरकारकडून केले जात आहे का याकडे सरकारने बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे. दंगल नियंत्रणाबाबत मागील महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारवर गंभीर ताशेरे ओढले. नको त्या शब्दांमध्ये संभावना केली, त्यानंतर तरी सरकार गंभीरपणे वागेल अशी अपेक्षा होती, मात्र ती फोल ठरली असल्याचे मत तिवारी यांनी व्यक्त केले.
भारतीय प्रशासकीय तसेच भारतीय पोलिस सेवेत वरिष्ठ पदावर येताना देश, देशाची घटना याच्याशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घ्यावी लागते. प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या शपथेचे स्मरण कायम ठेवावे, सत्ताधाऱ्यांकडून घटनाबाह्य, भविष्यात गंभीर होतील अशा गोष्टी घडत असतील तर त्याची त्यांना वेळीच पूर्वसुचना द्यावी असे आवाहनही तिवारी यांनी केले.