बारामती- काही नेत्यांनी वेगळी भूमिका घेतली, लोकशाहीत त्यांना त्यांचा अधिकार आहे. राष्ट्रवादीत फूट पडलेली नाही. वेगळा निर्णय घेतला म्हणजे पक्षात फूट म्हणता येणार नाही, असं मोठं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केलं आहे. या वक्तव्यामुळे आता राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. काल खासदार सुप्रिया सुळे यांनीही अजित पवार हे आमचेचं नेते आहेत, अशी प्रतिक्रीया दिली होती.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट नाही, अजित पवार आमच्याच पक्षाचे नेते- सुप्रिया सुळे
काल खासदार सुप्रिया सुळे पुणे दौऱ्यावर होत्या. यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रवादीतील फुटीबाबत प्रतिक्रीया दिली होती. राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात फूट नाही, अजित पवार आमच्याच पक्षाचे नेते आहेत असे सांगतानाच राज्यात एक उपमुख्यमंत्री भाजपचे आहेत. दुसरे कुठले आहेत? कुठल्या पक्षाचे आहेत? मला माहिती नाही, असे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकाराशी बोलताना सांगितले. पुणे महापालिकेत मतदारसंघातील प्रश्नासंदभाबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
आज खासदार शरद पवार बारामती येथे होते. आज सकाळी पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केला. यावेळी पवार म्हणाले, ते आमचेचं नेते आहेत, राष्ट्रवादीत कोणतीही फूट पडलेली नाही. वेगळा निर्णय घेणं हा त्यांचा निर्णय आहे. लोकशाहीत त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे. फूट पडणे याचा अर्थ पक्षातून एक मोठा गट वेगळा होणं, अशी परिस्थिती इथे झालेली नाही, असंही पवार म्हणाले.
काल खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर आज दुसऱ्याच दिवशी शरद पवार यांनी राष्ट्रवादीतील परिस्थितीवर वक्तव्य केलं आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. आज सायंकाळी खासदार पवार यांची कोल्हापुरात सभा होणार आहे. या सभेत पवार काय बोलणार, कोणावर टीका करणार याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.
दरम्यान, सभेपूर्वीच दोन दिवस अगोदर आमदार रोहित पवार यांनी कोल्हापूर दौरा करत, मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप केले आहेत.