पुणे : छत्रपती संभाजीराजे हे धर्मवीरच होते. त्यांना धर्मवीर न म्हणणे हे त्यांच्या विचारांशी द्रोह आहे, असा जोरदार टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना नाव न घेता लगावला. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्रात नसते, तर एकही हिंदू उरला नसता, असेही ते म्हणाले.
पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होेते. ते म्हणाले, “संभाजी महाराज यांना स्वराज्य रक्षक म्हणण्यास कोणाचाही विरोध नाही, ते स्वराज्य रक्षक आहेतच. मात्र, ते धर्मवीर नाहीत, असे म्हणणे हा त्यांच्या विचारांशी द्रोह आहे. हा त्यांच्यावर अन्यायच आहे. संभाजी महाराजांना अनन्वित अत्याचार का सहन करावे लागले? औरंगजेबाने काय मागणी केली होती? खऱ्या अर्थाने देव, देश आणि धर्मासाठी संभाजी महाराज लढले.”
शरद पवार यांना आम्ही जाणता राजाच म्हणू, असे विधान राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केले. त्याबाबत विचारले असता ते म्हणाले, “कोणाला काय म्हणायचे असेल ते म्हणावे. माझे म्हणणे एवढेच आहे की, या देशात एकच जाणते राजे होते ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. कुणाला आपल्या नेत्यांना काय म्हणायचे असेल ते म्हणावे जनता मात्र, म्हणणार नाही.”