पुणे : समर्थ रामदासांवर प्रेम करणाऱ्यांची आज आवश्यकता आहे. जात, भाषा, संप्रदायाच्या माध्यमातून आज जे जे लोक येत आहेत, ते तोडण्याची भाषा करत आहेत. ही महाराष्ट्रासाठी सगळ्यात मोठी खंत आहे. समर्थांसारखा परिपूर्ण ज्ञानाचा साठा कुठेही मिळणार नाही, हे समजणे गरजेचे आहे. आपल्या राज्यात अजूनही औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे लोक आहेत. छत्रपती संभाजीनगरचे नामकरण झाले तेव्हा काही लोकांच्या पोटात दुखले. जल्लोषही करता आला नाही, अशी खंत स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांनी येथे व्यक्त केली.
समर्थ व्यासपीठाच्या वतीने समर्थव्रती दिवंगत सुनीलदादा चिंचोलकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ, ‘शिवसमर्थ पुरस्कार’ तुळजापूर येथील शिवसमर्थ भक्त दादासाहेब जाधव यांना प्रदान करण्यात आला. शिवसमर्थ पुरस्कार, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, तुळशीरोप आणि ५१ हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी स्वामी गोविंददेवगिरी बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, आपल्या देशाचे तुकडे व्हावेत यासाठी गेली १५० वर्षे आंतराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न होत आहेत, त्याला खतपाणी घालणारे हस्तक आजही महाराष्ट्रात आहेत. काय झालय या महाराष्ट्राला कळत नाही असे म्हणत त्यांनी खंत व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराज, समर्थ रामदासांचा वारसा असणाऱ्या या राज्याला पुढे त्यांच्यासारखे नेतृत्व मिळाले नाही हे दुर्दैव आहे. महाराष्ट्रात एकी असती तर देशासाठी त्याचा उपयोग झाला असता. औरंगजेबाला पापी म्हणताना इथली मंडळी घाबरतात, छत्रपती संभाजीनगरचे नामकरण झाले तेव्हा राज्य आनंदाने बहरुन जायला हवे होते. पण ते नामकरणही काही लोकांच्या पोटात दुखत आहे, म्हणून जल्लोष मोठ्या प्रमाणावर केला नाही, अशी खंत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली. या पुरस्कार समारंभावेळी समर्थ संस्थानचे विश्वस्त बाळासाहेब स्वामी, समर्थ व्यासपीठच्या अध्यक्षा डॉ. माधवी महाजन यांची उपस्थिती होती. या वेळी डॉ. पराग मांडकीकर यांनी ‘समर्थ रामदास स्वामी’ यांच्यावर बनवलेल्या वेबसाईट (www.samarthramdas400.in) आणि मोबाइल अॅपचे उदघाटन करण्यात आले.