पुणे : स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीशेजारी असलेल्या वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवण्याची मागणी कोल्हापूरचे युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी नुकतीच केली होती. मात्र आता या पुतळ्यावरून काही ओबीसी संघटना आक्रमक झाल्या आहेत. ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनीसुद्धा तारखेबाबत सवाल उपस्थित केला आहे. तर हा वाद छत्रपतींच्या वंशांनी काढावा हे दुर्दैव असल्याचे मत इतिहासतज्ज्ञ संजय सोनवणी यांनी व्यक्त केले आहे.
वाघ्या श्वानच्या स्मारकावरून वाद : ३१ तारखेलाच अल्टिमेटम का ? लक्ष्मण हाकेंचा संभाजी राजेंना सवाल
सोनवणी म्हणाले, अनेक ऐतिहासिक शिल्पात छत्रपती शिवरायांसोबत हा वाघ्या दिसत आहे. शिवाजी महाराजांसोबत हा श्वान नेहमी सोबत राहत होता. म्हणून याचा उल्लेख जर्मन लोकांनी देखील जपून ठेवला आहे. १६८० मध्ये शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला, त्यावेळी त्यांच्या समाधी मांडली आणि तिथं तो कुत्रा महाराजांच्या समाधीकडे पाहत आहे. असा उल्लेख १८४५ मध्ये लिहिलेल्या ग्रंथांमध्ये आहे.
वाद निर्माण केला जातोय हे दुर्दैव
छत्रपतींच्या सैन्यात कुत्र्यांचे देखील पथक होते. त्याचे देखील पुरावे आहेत. गनिमी काव्याने कुत्र्याची झुंड आधी छत्रपती सोडायचे. वाघ्या हा स्वामीनिष्ठ होता. ईमानदार होता. इंग्रजांनी रायगड वर हल्ला केला. त्यावेळेस अनेक वास्तू नष्ट झाल्या होत्या. वाघ्याचा आताच पुतळ्याला होळकर यांनी निधी दिला होता. वाघ्या ऐतिहासिक नव्हता हा दावा खोटा आहे. पुतळाबाई यांची समाधी नाही त्या सती गेल्या. सोयरा राणींची समाधी नाही. सोयरा बाईंची हत्या झाली होती. त्यांची देखील समाधी असू शकत नाही. सईबाईंची समाधी राजगडावर आहे. त्यांच्या समाधीचा देखील उल्लेख इतिहासात कुठेच सापडत नाही. काही पुरावे लिखित तर काही वास्तूच्या स्वरूपात मिळत असतात. पावनखिंडचे युद्ध तिथे झालं का नाही झालं हा अजूनही प्रश्न आहे? वाद हा ऐतिहासिक असतो. केवळ वाद निर्माण केला जात आहे हे दुर्दैव आहे. औरंगजेब जगाच्या पाठीवर कुठेही मेला असता तरी त्याची समाधी खुलताबादला झाली असती कारण त्याची शेवटची इच्छा होती. हा वाद उकरून काढला जात आहे. आणि हा वाद छत्रपतींच्या वंशांनी काढावा हे दुर्दैव असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.