पुणे: भारतीय जंगले ही ३० वर्षांत मोठ्या प्रमाणात कापली गेली. जंगल आणि प्राणी हे परस्परावलंबी आहेत. त्यामुळे जंगल वाचवायची असतील तर मांस खाणे हे कायद्याने बंद व्हायला हवे. वन्यजीवविषयक कायदे आपण शिकायला हवे. देशात वन्य प्राण्यांसाठी सरकारकडे एकही हॉस्पिटल नाही, हे दुर्दैवी आहे, असे माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी सांगितले.
राष्ट्रीय कर्तव्य परिषद, पुणे आणि राष्ट्रीय वन्यजीव संरक्षण पर्यावरण परिषदेचे आयोजन सोयरे वनचरे सामाजिक संस्था, स्वर्गीय बेनके गुरुजी सोशल ट्रस्ट यांच्या सहयोगाने घोले पाटील रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक सभागृहात करण्यात आले. यावेळी गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, पद्मश्री गिरीश प्रभुणे, राष्ट्रीय कर्तव्य अभियान मुख्य संयोजक विजय वरूडकर, नारी शक्ती पुरस्कार प्राप्त सर्पमित्र वनिता बोराडे, डॉ. हेडगेवार स्मारक सेवा समितीचे कोषाध्यक्ष अभय माटे, अक्षय महाराज भोसले, डी. भास्कर, अभय माटे, रमेश अग्रवाल, बापू पाडळकर, गणेश बाकले आदींसह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात पद्मश्री गिरीश प्रभुणे यांना स्वामी विवेकानंद जीवनगौरव पुरस्कार आणि मनेका गांधी यांना राजमाता जिजाऊ पुरस्काराने गौरविण्यात आले. वन्यजीव रक्षक सर्पमित्र एस. बी. रसाळ, विनय कुलकर्णी, डॉ. गणेश गायकवाड, राजश्री कडगल, बाळ काळणे, सुकेश झंवर यांना विवेकानंद वन्यजीव रक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संस्थेचे दिवंगत विश्वस्त सामाजिक कार्यकर्ते स्व. नारायणकुमार फड यांच्या नावाने सामाजिक कार्यकर्ता प्रथम पुरस्कार स्वप्नील गंगणे यांना प्रदान करण्यात आला.
गांधी म्हणाल्या, अनेक प्राणी संग्रहालये ही अनधिकृत आहेत. तिथे काम करणारे प्रशिक्षित नाहीत. त्यामुळे प्राणी व पक्षीप्रेमींनी याकरिता एकत्र येण्याची गरज आहे. वन्यजीव, पक्षी-प्राणी यांचे संरक्षण केले तरच पर्यावरण समतोल राहील, असे त्यांनी सांगितले. शेखर मुंदडा म्हणाले, महाराष्ट्रातील सर्व गोशाळांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचे आमचे ध्येय आहे. अंत्यविधी करता लाकूड नाही, तर शेणाच्या गोवऱ्या वापरल्या तर गाय आणि झाडे दोन्हीही वाचतील.