पुणे: सध्या शुध्द हवेचा श्वास घेणे पुणेकरांना अत्यंत कठीण झाले आहे. कारण वाहनांची संख्या प्रचंड असल्याने त्यातील धुरासोबत कित्येक प्रदूषित धुलिकण शरीरात जात आहेत. परंतु, शुध्द हवा घेता येणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. त्यासाठी किमान एक दिवस मोफत बस प्रवास दिन साजरा केला तर हवेच्या प्रदूषणात घट होऊ शकणार आहे. त्याची मागणी शहरातील संस्थांनी पीएमपीकडे केली आहे.
जागतिक पातळीवर ७ सप्टेंबर हा दिन स्वच्छ हवा, स्वच्छ निळ्या आकाशासाठी या थीमवर साजरा केला जातो. वायू प्रदूषण जागतिक स्तरावर मृत्यू आणि रोगांच्या कारणांपैकी एक मुख्य कारण आहे. दैनंदिन जीवनात स्वच्छ हवेचे महत्त्व पटवून देण्यासाठी दरवर्षी ७ सप्टेंबर इंटरनॅशनल डे ऑफ क्लीन एयर फॉर ब्लू स्काईज म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरा केला जातो. या दिनानिमित्ताने ७ सप्टेंबरचा दिवस फ्री बस डे घोषित करावा, अशी मागणी पुणे एअर ॲक्शन हब मंचने पीएमपी पुणे महापालिका आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे केली आहे.
पार्किंगचा होईल ताण कमी
मोफत बस प्रवास दिनाचे अनेक लाभ आहेत. त्यामुळे वायू प्रदूषण आटोक्यात येऊन शहरातील वातावरण सुधारेल. शिवाय सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करणाऱ्या नागरिकांचे प्रमाण वाढायला मदत होईल. सार्वजनिक वाहतुकीमुळे कोंडी कमी होईल, सार्वजनिक आरोग्य सुधारेल, सायकलिंग व पायी चालणे यासारख्या बिगर-स्वयंचलित वाहतूक साधनांच्या वापराला प्रोत्साहन मिळेल आणि वाहनांच्या पार्किंगचा ताण कमी होईल.
''विनावाहन दिवस अधिकृतपणे जोडल्यास ‘फ्री बस डे’ची परिणामकारकता वाढू शकते. यापूर्वी पीएमसीमध्ये हा प्रयत्न केला गेला होता. जेथे पीएमसी कर्मचाऱ्यांनी महिन्यातून एक दिवस त्यांची खासगी वाहने वापरली नाहीत, अशा उपक्रमांचे पुनरुज्जीवन व्हायला हवे. पीएमपीने रक्षाबंधन आणि इतर काही सणांच्या दिवशी मोफत बस दिवस म्हणून घोषित केले होते आणि असे उपक्रम राबविले पाहिजेत. - जुगल राठी, पीएमपी प्रवासी मंच''
''आपल्या फ्री बस डेच्या मागणीला पीएमपीएमएलचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक सचिंद्र प्रताप सिंग यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पुणे मनपा व पिंपरी-चिंचवड मनपा यांनी प्रवास खर्चाच्या भरपाईला मंजुरी दिल्यास हा दिन साजरा करायची आपली तयारी आहे, असे त्यांनी सांगितले आहे. - शर्मिला देव, परिसर संस्था''