Devendra Fadnavis Pune News: पुण्यात होत असलेल्या एका परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत झाली. या मुलाखतीत पुणे विमानतळासंदर्भात प्रश्न विचारला गेला. या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीसांनी पुण्यात प्रोजेक्ट करणं कठीण काम आहे, असे विधानही केले. या मागचे कारण जेव्हा मुख्यमंत्री फडणवीसांनी उपस्थितांना सांगितले, त्यावेळी सगळ्यांनाच हसू अनावर झाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पुणे विमानतळ खरंच होणार का आणि तुमच्या कारकीर्दतच होणार का? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला होता.
त्याला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, "फार चांगला प्रश्न तुम्ही विचारला. लोकं असाच प्रश्न मुंबई विमानतळाबद्दल विचारायचे. ते मी करून दाखवले. लोकं असाच प्रश्न ट्रान्स हार्बर लिंक बद्दल विचारायचे. कारण त्याची संकल्पना जेआरडी टाटांनी १९६० मध्ये तयार केली होती. तो आपण तयार करू शकलो. लोकं असंच कोस्टल रोडबद्दल बोलायचे."
मित्रांसहित काही मला वेड्यात काढलं होतं -फडणवीस
याच प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्गाचा किस्सा सांगितला. ते म्हणाले, "मी जेव्हा समृद्धी महामार्गाचं पहिलं सादरीकरण केलं, तर माझ्या काही मित्रांसहित अनेकांनी मला वेड्यात काढलं होतं की, असं होणार आहे का? असे रस्ते होतात का? मी राज्यभरातील संपादकांना बोलावून त्यांच्यासमोर सादरीकरण केले होते, त्यावेळी काही संपादकांनी मला कानात सांगितलं की, चांगला प्रकल्प आहे, झाला तर बरं होईल. म्हणजे त्यांना माहिती होतं की, तो होणार नाही; पण तो झाला", असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पुण्यात प्रोजेक्ट करणं कठीण, फडणवीसांनी काय दिलं उत्तर?
उत्तर देऊन झाल्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, "एक गोष्ट सांगतो, पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे, उत्पादक राजधानी देखील आहे. ही तंत्रज्ञानाची राजधानी देखील आहे. पण, पुण्यात प्रोजेक्ट करणं फार कठीण आहे", असे म्हणतात उपस्थित खळखळून हसले.
हाच मुद्दा पुढे नेत फडणवीस म्हणाले, "कारण काय आहे, जिथे अनेक बुद्धिवंत लोकं असतात, त्यांच्याकडे इतक्या आयडियाज् असतात. आणि प्रत्येकाला हे दाखवायचं असतं की, दुसऱ्याची आयडिया कशी खोटी आहे", असे विधान करताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.