पुण्यात कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या वाढतेय ही समाधानाची बाब: उपमुख्यमंत्री अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 04:25 PM2020-08-14T16:25:34+5:302020-08-14T16:49:15+5:30
कोरोनाविरुद्धची लढाई आपण नक्की जिंकू असा विश्वास अजित पवार यांनी यावेळी बोलून दाखविला..
पुणे: पुणे व पिंपरी चिंचवड या शहरांमध्ये गेल्या काही दिवसांत कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे ही निश्चित समाधानाची बाब आहे.तसेच रुग्णालयांमधील गंभीर रुग्णांवर उपचार करताना त्यांना बरे करण्यासाठी प्लाझ्मा पद्धत निश्चितच उपयोगी ठरेल असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त व्यक्त केले.
पुण्यात उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय कार्यालयात कोरोना निर्मूलन आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला पुणे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह विविध वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. पवार म्हणाले, कोरोनाविरुद्ध लढताना या आजाराविषयीची भीती दूर करण्यासोबतच शहरांसह ग्रामीण भागात देखील दक्षता व उपाय योजनांबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची आवश्यकता आहे.तसेच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शिस्तबद्ध नियोजन, मृत्यूदर आटोक्यात ठेवणे आणि चाचण्यांची संख्या वाढवण्यावर भर देणे महत्वाचे आहे. रुग्णांना वेळेवर उपचार देणे तितकेच गरजेचे आहे. कोरोना विरुद्धची लढाई जिंकण्याचा विश्वास व निर्धार देखील पवार यांनी यावेळी बोलून दाखविला.
गेल्या पंधरा दिवसांत शहरी भागात कोविडची परिस्थितीत चांगली सुधारणा झाली आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असून, बेड देखील उपलब्ध होत असल्याने महापौरांसह अन्य लोकप्रतिनिधीने समाधान व्यक्त केले. परंतु, ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मृत्यूदर देखील वाढला आहे. एमआयडीसी क्षेत्र असलेल्या तालुक्यात ही वाढ खूपच आहे. त्यात अनेक तालुक्यात आज ही गंभीर रुग्णांना उपचार मिळत नाही. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स बेड्स मिळत नाही. पुण्यातील खाजगी हाॅस्पिटल मध्ये , जम्बो हाॅस्पिटलमध्ये ग्रामीण भागासाठी स्वतंत्र कोठा निश्चित करा, चाचण्याचे प्रमाण वाढवण्याची मागणी करण्यात आली
मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे दिलीप मोहिते पाटील, अतुल बेनके, अशोक पवार, सुनिल शेळके यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या.