पुणे : पुण्यात आधी लक्ष्मी रस्ता आणि तुळशीबाग हा भाग फॅशनची नगरी म्हणून ओळखला जायचा. परंतु पुणे आता व्हायब्रंट हाेतंय. इथे आता जगभरातील फॅशन ब्रॅंड्सना बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. त्यामुळे गेल्या दाेन दशकांपासून हेच ते माझं पुणे आहे का ? असे आश्चर्याचे सुखद धक्के मला मिळत असल्याचे मत अभिनेत्री साेनाली कुलकर्णी हिने व्यक्त केले. पुण्यातील स्मिता पटवर्धन आणि नैना मुथा यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या ‘कुटूर’ या खास डिझायनर दागिने, कपडे आणि अॅक्सेसरीजच्या प्रदर्शनाचे शनिवारी कोरेगाव पार्क येथील हॉटेल वेस्टीन येथे उद्घाटन झाले. त्यावेळी सोनाली बोलत होती.
साेनाली कुलकर्णी म्हणाली, आपले राहणीमान, जीवनशैली यातूनच फॅशन विकसित होत जाते. काळाप्रमाणे फॅशन केल्याने काळाच्या बरोबर असल्याचा आत्मविश्वास मिळतो. आधी महिला इतरांच्या विचाराने चालत, आता त्या स्वतः ठरवतात काय घालायचे, कसे राहायचे. त्यांच्यातील हा बदल स्वागतार्ह आहे. यामुळे त्या नवे काही करू बघत आहेत व सोबतीला अजून काहींना घेत सक्षम होत आहेत. त्यामुळे फॅशन उद्योगाला मिळणारी प्रसिद्धी अवाजवी नसून यातून कलाकार, कारागीर, डिझायनर अशा सगळ्यांनाच प्रोत्साहन मिळत आहे व फॅशन ही कला म्हणून वाढत आहे,” असेही ती यावेळी म्हणाली.