बारामती/पुणे : एसटी महामंडळाचे (MSRTC) शासनामध्ये विलनीकरण करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी राज्यात काही ठिकाणी ऐन दिवाळीत संप पुकारला आहे. सणासुदीच्या काळात या संपामुळे प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत. औद्योगिक न्यायालयाने संपावर न जाण्याचे आदेश दिले होते. संपाबाबत दिलेल्या निर्देशाची मुंबई उच्च न्यायालयानेही गंभीर दखलही घेतली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली आहे. ''कोर्टाने सुद्धा हा संप कायदेशीर नसल्याची भूमिका घेतली असून कोर्टाचा आदर ठेवून हा विषय संपवावा असे त्यांनी कर्मचाऱ्यांना सांगितले आहे. बारामतीत स्नेहमेळाव्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
पवार म्हणाले, राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी संघटनेचे काही व्यक्ती आम्हाला भेटले. आणि त्यांना सांगितले की हा संप त्यांना पुढे घेऊ जायचा नाही. एसटी संकटात आहे हे आम्हालाही माहित आहे. परंतु दिवाळीच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना त्रास होऊ देण्याची आमची इच्छा नाही. परंतु काही लोकांनी टोकाची भूमिका घेतली आहे त्यामुळे हे घडतंय.
''एसटी कर्मचाऱ्यांनी संस्थेच्या हितासाठी आणि नागरिकांची सेवा चालू ठेवण्यासाठी फार काळ ताणून धरणे योग्य ठरणार नाही. कोर्टाने सुद्धा हा संप कायदेशीर नसल्याची भूमिका घेतली आहे. कोर्टाचा आदर ठेवून हा विषय संपवावा असंही ते म्हणाले आहेत.''
''सद्यस्थितीत आपण हळूहळू संकटातून बाहेर निघत आहोत. परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर नेहमीचा कारभार करू. गेल्या दोन वर्षात जे आर्थिक नुकसान झालं ते भरून काढू, अर्थव्यवस्था समाजव्यवस्था सावरण्याची काळजी घेणार असल्याचे ते यावेळी म्हणाले आहेत.''
लक्ष्मी पूजनादिवशी एसटीच्या ५९ आगारांतून एकही बस सुटली नाही
गेल्या काही दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचारी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. सरकारने त्यांच्या काही मागण्या पूर्ण केल्या आहेत. मात्र आता महामंडळाचे शासनात विलनीकरण करावे यासाठी पुन्हा आंदोलनाला जोर मिळण्याची शक्यता आहे. संप करू नका असे उच्च न्यायालयाने बजावले असतानाही लक्ष्मी पूजनादिवशी एसटीच्या ५९ आगारांतून एकही बस न सुटल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाल्याचे दिसून आले.