पुणे : ‘हंगामा खडा करना मेरा काम नहीं, सूरत बदलनी चाहिए... हे साहित्यिकाचे ब्रीदवाक्य असायला हवे. दु:खाची आणि वेदनेची भाषा बोलते ते साहित्य. साहित्यिकांनी दु:खाचे गाणे गायले पाहिजे, अशा शब्दांत राज्याचे निवृत्त अतिरिक्त पोलीस महासंचालक अशोक धिवरे यांनी लेखणीतून वाद ओढवून घेणाऱ्या साहित्यिकांना साहित्याची खरी परिभाषा उलगडून सांगितली. निमित्त होते, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल लक्ष्मीकांत देशमुख यांच्या सत्कार समारंभाचे. राष्ट्र सेवा दलाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्र सेवा दलाचे कार्यकारी विश्वस्त डॉ. अभिजित वैद्य आणि प्रमुख पाहुणे म्हणून माजी अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक सुरेश खोपडे उपस्थित होते. डॉ. वैद्य यांच्या हस्ते देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. खोपडे म्हणाले, एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करताना मराठी भाषा खरंच सक्षम आहे का? याचा विचार व्हायला हवा. आज ग्रामीण भागात इंग्रजीच्या शाळा सुरू झाल्या आहेत. इंग्रजी ही व्यावहारिक भाषा असल्यामुळे शेतमजुरालाही आपल्या मुलाला इंग्रजी शाळेत घालण्याचा मोह होत आहे. सत्काराला उत्तर देताना लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले, ‘लेखक साहित्यातून दु:खाची कहाणी सांगत असतो. प्रत्येक माणसाचे दु:ख हे वेगळे असते. प्रत्येक जाती धर्म, वंचित घटकांच्या दु:खावर भाष्य करायला हवे. मी अगदी गावपातळीपासून ते आंतरराष्ट्रीय स्तरावर लिखाण केले आहे. माजी प्रशासकीय अधिकारी असतानाही लेखन करीत होतो. त्या लिखाणावरून अनेकदा मोर्चे निघाले, चार बदल्या झाल्या. तरीही शासनाच्या चौकटीत राहून लिखाण करण्याचे काम केले. बदलाच्या प्रक्रियेत विवेकवाद आणि विज्ञानवाद जोपासला गेला पाहिजे.’ डॉ. अभिजित वैद्य म्हणाले, ‘एकीकडे मानवी मूल्यांची घसरण होत आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आले आहे, अशा परिस्थितीत साहित्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्याची खरी गरज आहे.’
हंगामा खडा करना मेरा काम नहीं...; अशोक धिवरे यांनी उलगडली साहित्याची परिभाषा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 12:58 PM
साहित्यिकांनी दु:खाचे गाणे गायले पाहिजे, अशा शब्दांत राज्याचे निवृत्त अतिरिक्त पोलीस महासंचालक अशोक धिवरे यांनी लेखणीतून वाद ओढवून घेणाऱ्या साहित्यिकांना साहित्याची खरी परिभाषा उलगडून सांगितली.
ठळक मुद्देबदलाच्या प्रक्रियेत विवेकवाद आणि विज्ञानवाद जोपासला गेला पाहिजे : लक्ष्मीकांत देशमुखअभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आले आहे : डॉ. अभिजित वैद्य