श्रीकिशन काळे-राजेंद्र मांजरे
पुणे-खरपुडी : खेड तालुक्यातील खरपुडी गावातील ज्येष्ठ नागरिकावर एका तरसाने हल्ला केला. त्यामुळे या तरसाविषयी अनेक गैरसमज सोशल मीडियावर पसरत आहेत. परंतु, हा प्राणी हल्ला करणारा नसून, अत्यंत लाजाळू असतो. यापूर्वी माणसांवर हल्ला केल्याची घटना नोंदवलेली नाही. त्यामुळे या प्राण्याला कदाचित त्रास दिल्याने तो आक्रमक झाला असावा आणि त्यामुळे त्याने हल्ला केल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. अनेकांनी याला विद्रूप असल्याचे म्हटले आहे, पण खरंतर हा सडलेले अन्न खाऊन जगतो आणि म्हणून याला स्वच्छतादूत असे समजले जाते.
खरपुडी खंडोबा येथे वनक्षेत्र आहे. वाकी आणि खरपुडी या गावातील दोघांवर तरसाने हल्ला केला आहे. परिसरात दोन दिवसांपासून हा तरस फिरत होता. त्यामुळे कदाचित त्याला दगड फेकून मारल्याने तो आक्रमक होऊन सैरभैर झाला असावा, असे परिसरातील जाणकारांनी सांगितले. पुण्यातील टेकड्यांवरून तो कधीच गायब झाला आहे.
वन्यजीवांच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या ‘द ग्रासलँड’ या संस्थेचे मिहीर गोडबोले म्हणाले, ‘‘सध्या अनेक माध्यमांद्वारे एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर प्रसारित होत आहे, जो भारतीय पट्टेरी तरसाबाबत गैरसमज पसरवू शकते. व्हिडिओत दिसणारा प्राणी- 'भारतीय पट्टेरी तरस' हा अतिशय लाजाळू प्राणी असून नेहमीच माणसापासून दूर राहणे पसंत करतात आणि मुख्य म्हणजे पर्यावरणाच्या स्वच्छतेचे काम करतात. द ग्रासलँँड ट्रस्ट टीमने गेल्या दशकभरात केलेल्या तरसाच्या पाहणीत अशा एकाही घटनेची नोंद नाही.’’
—————————
तरस कधी हल्ला करत नाही
या अत्यंत असामान्य चकमकीमागे खालील संभाव्य कारणे असू शकता, एक म्हणजे व्हिडिओत दिसणाऱ्या तरसाचा काही लोकांनी आधीच पाठलाग करून त्याला त्रास दिला असावा, त्यामुळे व्यथित होऊन त्याने त्या व्यक्तीवर बचावात्मक हल्ला केला असावा. तरसाने हल्ला करण्या आधीच ही घटना आपल्या मोबाईलद्वारे टिपण्याचा प्रयत्न करण्यासाठी जमलेल्या जमावावरून ही शक्यता अधिक वाटते. दुसरी शक्यता- तरसाला रेबिज सारख्या रोगाचा संसर्ग झाला असू शकतो. मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांमार्फत रेबिजसारखे प्राणघातक रोग अशा वन्य प्राण्यांना होतात, ज्यामुळे ते अधिक आक्रमक होतात व वाटेत आलेल्या कोणत्याही गोष्टीस चावण्याचा प्रयत्न करतात.
- मिहीर गाेडबोले, द ग्रासलँड संस्था
————————————
खरपुडी परिसरातील वनक्षेत्रात अनेक तरस आहेत. परंतु, त्यांनी कधीही माणसांवर हल्ला केला नाही. या तरसाने दोघा-तिघांना जखमी केले त्यांना वन विभागातर्फे नुकसानभरपाई देण्यात येणार आहे.
- दत्ता पाफळे, वनपरिक्षेत्र अधिकारी
——————————-
डोंगराळ भागात टेकड्यांवर तरस आढळतो. यांचा जबडा खूप माेठा आणि चावा जबरदस्त असतो. म्हणून ते गाई, म्हशी यांची हाडकं फोडून खाऊ शकतात. जनावरं मेेल्यानंतर त्यांना हे खातात. म्हणून त्यांना स्वच्छतेचे दूत म्हणतात. पण आता त्यांना असे अन्न मिळत नाही. पठारावर, साळिंदरच्या बिळात, कपारीत हा राहतो. त्यांच्या पिल्लांना काही असुरक्षितता झाली तर ते हल्ला करतात. अन्यथा माणसांवर ते हल्ला करत नाहीत.
- प्रभाकर कुकडोलकर, माजी वनाधिकारी
—————————————