पुणे : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी पुणे पोलिसांनी माय सेफ पुणे हे ॲप बनविले असून, पोलीस गस्तीसाठी आता त्याचा १०० टक्के वापर करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने पोलीस आयुक्तालयात मंगळवारी शहर पोलीस दलातील सर्व पोलीस ठाण्यातील ड्युटी अंमलदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी सर्वांना या ॲपची उपयुक्तता व त्याचे कार्य यासंबंधी माहिती दिली.
शहरातील गुन्हेगारीवर वचक ठेवण्यासाठी शहरातील सर्व पोलीस ठाण्यांतर्गत महत्त्वाच्या ठिकाणी गस्त घालण्यात येते. पोलीस संबंधित ठिकाणी गस्त घालत आहे की नाही, हे समजण्यासाठी यापूर्वी क्यूआर कोड पद्धत अवलंबण्यात आली होती. शहराच्या सुमारे ८ हजार महत्त्वाच्या ठिकाणी क्यूआर कोड लावण्यात आलेला आहे. गस्त घालताना संबंधित पोलीस अंमलदार त्या ठिकाणी गेला की त्याने हा क्यूआर कोड स्कॅन करुन पोलीस ठाण्यास पाठवावा लागत असे. अनेकदा हे क्यूआर कोड पावसामुळे खराब होणे, फाटणे असे प्रकार घडत असत. पोलिसांची गस्त अत्याधुनिक करण्यासाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या प्रयत्नातून माय सेफ पुणे हे ॲप विकसित करण्यात आले आहे. त्याचे लोकार्पण १५ जून २०२१ रोजी पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले होते. या ॲपचा वापर सुरु असला तरी सर्व पोलीस ठाण्यांकडून अजूनही त्याचा पूर्णपणे वापर सुरु झाला नव्हता. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आज एक आदेश काढला आहे. यापूर्वीची क्यूआर कोड पद्धत बंद करुन यापुढे माय सेफ पुणे या ॲपचा १०० टक्के वापर करण्याचा आदेश दिला आहे.
असे चालत माय सेफ पुणे
पोलीस ठाण्यातील बीट मार्शल हे हद्दीमध्ये गस्त घालत असताना किंवा कोणत्याही घडलेल्या ठिकाणी भेट देऊन त्या ठिकाणी सेल्फी फोटो काढून तो माय सेफ पुणे या ॲपवर अपलोड केल्यास घटनेच्या ठिकाणाच्या अक्षांश व रेखांश व वेळ नोंद होते. ॲपवरून पोलीस नियंत्रण कक्षाला पोलीस कोठे गस्तीवर आहे, याची माहिती मिळते. बिट मार्शलने कोणत्या वेळी, कोणत्या ठिकाणी भेट दिली याची सर्व माहिती ॲपमध्ये उपलब्ध होते. त्यानुसार पोलिसांची गस्त व अन्य बाबींचा आढावा घेणे वरिष्ठ पोलिसांना वेळोवेळी शक्य होणार आहे.