लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “स्थायी समितीच्या बैठकीत ऐनवेळी दाखल केलेल्या वादग्रस्त विषयांना पाठिंबा देणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक पक्षाचे आदेश धुडकावून चुकीचे वागले असतील तर, त्याची शहनिशा करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासणे हे आमचे कामच आहे,” असे सांगून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांची पाठराखण केली. जगताप यांनी ‘राष्ट्रवादी’च्या नगरसेवकांबद्दल घेतलेली भूमिका ही पक्षाचीच असल्याचे सांगत पवारांनी सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे समर्थनच केले़
“स्थायी समितीत असणारे पक्षाचे नगरसेवक खोटे बोलत असतील तर त्यांचे सदस्यत्वच रद्द करण्याबाबत पक्षच विभागीय आयुक्त कार्यालयात तक्रार करणार आहे. त्यासाठी स्थायी समितीच्या कामकाजाचे सीसीटीव्ही फुजेट तपासणार आहे,” असे प्रशांत जगताप यांनी गुरुवारी (दि.२) पत्रकार परिषद घेऊन सांगितले होते. त्यास अजित पवारांचाही होकार मिळाल्याने ‘राष्ट्रवादी’च्या स्थायी समितीमधील नगरसेवकांच्या डोक्यावर टांगती तलवार आली आहे.
कोरोना आढावा बैठक संपल्यानंतर पवार पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी पवारांना शहर ‘राष्ट्रवादी’त सुरू झालेल्या मतभेदांबद्दल विचारले असता पवार म्हणाले, “सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचा गैरअर्थ काढू नये. फुटेज चेक करणे म्हणजे कोणावर गैरविश्वास दाखविणे असे होत नाही.” विकास कामांबाबत जनतेला आम्ही काही शब्द दिले आहेत. कोणताही पक्ष निवडून आला तरी विकास कामात व पुणेकरांच्या हिताच्या निर्णयांना ‘राष्ट्रवादी’चा पाठिंबा राहील ही भूमिका आम्ही पहिल्यापासून घेतली आहे. परंतु, एखादा निर्णय घेताना काही चुकीचे घडत असेल, निर्णय प्रक्रियेत काही पाणी मुरते आहे, अशी शंका वाटत असेल तर त्याला विरोध करणे आमचे काम आहे, असे पवारांनी स्पष्ट केले.
गेल्या आठवड्यात पक्षाचे शहरातील खासदार, आमदार यांच्यासह आजी माजी पदाधिकाऱ्यांची मी बैठक घेतली होती. यात चर्चा करून पक्षाची भूमिका निश्चित झाली होती. असे असताना आमचे स्थायी समिती सदस्य चुकीचे वागले असतील तर त्याची शहनिशा करणे योग्यच असल्याचे पवार म्हणाले. शहराध्यक्ष जी भूमिका घेतील तीच पक्षाची भूमिका असेल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
चौकट
या चौघांवर संशय
नंदा लोणकर, बंडू गायकवाड, प्रदीप गायकवाड, अमृता बाबर हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चार नगरसेवक स्थायी समितीमध्ये आहेत. यातील बाबर या पक्षाची परवानगी घेऊन गेल्या काही दिवसांपासून गैरहजर आहेत. उर्वरीत तीन नगरसेवकांनी स्थायी समितीच्या बैठकीत कोणती भूमिका घेतली याबद्दल राष्ट्रवादी कॉंग्रेसला संशय आहेत. त्यांच्या चौकशीचा मुद्दा शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी लावून धरला आहे.
चौकट
सीसीटीव्ही फुटेजचा दबाव?
स्थायी समितीच्या बैठकीचे सीसीटीव्ही फुटेज मागवून राष्ट्रवादी कॉंग्रेस काय साधणार याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे. या फुटेजमध्ये केवळ चित्रीकरण असते. कोण काय बोलले हे त्यावरुन समजण्याची शक्यता कमी असते.