केडगाव - ऊसपिकाचे नियोजन केल्यास शेतकरी एकरी १०० टन उत्पन्न घेऊ शकतो, असे मत बारामती केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. मिलिंद जोशी यांनी केले. खुटबाव (ता. दौंड) येथे आयोजित कृषी विभागाच्या उन्नत शेती समृद्ध कार्यक्रमातंर्गत ते बोलत होते.या वेळी जोशी म्हणाले, की कृषी विभागामार्फत राज्यात शेती विकासाच्या तसेच शेतकरी कल्याणाच्या राबविल्या जाणाऱ्या विविध योजना व कार्यक्रमाची परिणामकारकपणे अंमलबजावणी करण्यासाठी सन २०१७-१८पासून ‘उन्नत शेती-समृद्ध शेतकरी’ मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये कृषी विभागाच्या विविध योजनाबद्दलची सविस्तर माहिती देण्यात येते. त्याच अनुषंगाने दौंड तालुक्यात सलग दुसºया वर्षी कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) योजनेअंतर्गत खुटबाव येथे शेतकरी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.तालुका कृषी अधिकारी जयश्री कदम यांनी कृषी विभागाच्या विविध योजना याविषयी माहिती सांगितली. शेतकरी वसुधा सरदार यांनी सेंद्रिय शेतीचे महत्त्व विशद केले. या वेळी खुटबाव गावाचे सरपंच शिवाजी थोरात, उपसरपंच सुनील फणसे, शरद शेलार, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन नवनाथ थोरात उपस्थित होते.प्रशिक्षण कार्यक्रमासाठी प्रा. अरुण थोरात, शेतकरी मित्र श्याम थोरात, राहुल पवार यांचे सहकार्य लाभले. कृषी सहायक संध्या आखाडे यांनी प्रास्ताविक केले. अरुण थोरात यांनी आभार मानले.तुकाराम घाटगे यांनी ऊसपीक उत्पादनाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. या वेळी पुणे जिल्ह्याचे प्रकल्प संचालक कुंडलिक कारखिले यांनी विविध योजनांची माहिती दिली.महेश रूपनवर यांनी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) योजनेअंतर्गत शेतकरी अभ्यास दौरे, शेतकरी प्रशिक्षण, किसान गप्पागोष्टी, सेंद्रिय शेती, शेतीशाळा याविषयी विस्तृत माहिती दिली.
ऊसपिकाच्या नियोजनामधून एकरी १०० टन उत्पन्न शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 2:27 AM