नम्रता फडणीस-
पुणे: विचार करा, एका मोठ्या मैदानात अनेक कार आखून दिलेल्या पट्टीत शिस्तबद्ध पद्धतीने उभ्या आहेत आणि समोर मोठ्या स्क्रीनवर चित्रपट सुरू आहे. कारमध्ये बसलेली चित्रपट प्रेमी मंडळी त्या चित्रपटाचा आस्वाद घेत आहेत..ना गर्दी ना एकमेकांच्या संपर्कात येण्याची भीती. हा 'ड्राइव्ह इन सिनेमा' चा जुना ट्रेंड पुन्हा पुण्या-मुंबईच्या चित्रपट संस्कृतीत रुजविता येणे शक्य आहे, अशी माहिती ऑस्कर अकादमीचे सदस्य तसेच तांत्रिक सल्लागार उज्ज्वल निरगुडकर यांनी दिली.
लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात व्यवसाय, उद्योगांना शिथिलता दिली असली तरी चित्रपट, नाट्यगृहांसह सांस्कृतिक कार्यक्रमांवर असलेली बंदी कायम ठेवण्यात आली आहे. लॉकडाऊन उठल्यानंतर देखील सुरक्षित अंतर राखावे लागणार असल्यामुळे त्यादृष्टीने काही नवीन पर्याय शोधावे लागणार आहेत. कोरोनामध्येही चित्रपट संस्कृती अबाधित राखता येणे शक्य आहे. त्यासाठी ' ड्राइव्ह इन सिनेमा' हा उत्तम पर्याय असल्याचे निरगुडकर यांनी ' लोकमत' ला सांगितले.
ते म्हणाले, आपल्याकडे ही संस्कृती काही वर्षांपूर्वी होती. 2010 मध्ये बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये असे थिएटर होते. जे मी पाहिले आहे. त्याला फक्त मोकळी जागा लागते. सध्याच्या कोरोना काळात हा जुना ट्रेंड सहजपणे रुजविणे शक्य आहे. मुंबई आणि पुण्यात काही मॉल्स आहेत. जिथे हे करता येणे शक्य आहे. कारमध्ये दोन माणसे बसतात. त्यामुळे सुरक्षित अंतर ठेवले जाऊ शकते. आपण फक्त संध्याकाळी हे चित्रपट पाहू शकतो. बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स थिएटर ठिकाणी मोठी स्क्रीन होती. छोटे खांब होते. त्यात स्पीकर लावलेले असायचे. त्या स्पीकरच्या खांबाजवळ असलेल्या कारला वायर घेऊन आवाज ऐकता येण्याची सोय होती. ज्यांनी पैसे भरले आहेत.त्यांनाच त्यातून आवाज ऐकणे शक्य होईल. तेव्हा एफएम रेडिओ नव्हते. पण आत्ता तो चॅनेलचा साऊंड ब्रॉडकास्ट करू शकतो. त्यासाठी खर्च खूप कमी येईल. जर कोरोना दोन वर्षे राहिला किंवा नाही तरी भीती कायम राहील. त्याकरिता हा उत्तम पर्याय आहे. अमेरिकेत अशी 300 थिएटर आहेत. जी पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.अमेरिकन प्रशासनाला चालकांनी ही थिएटर सुरू करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सचे थिएटर देखील पुन्हा सुरू करण्याचे महाराष्ट्र शासनाच्या विचाराधीन होते. एका कारसाठी 1000 रूपये शुल्क आकारण्याचा प्रस्ताव होता. पण त्याचे पुढे काय झाले माहिती नाही. कोणत्याही मोकळ्या जागेत हे करता येणे शक्य आहे. फक्त शासनाची परवानगी लागेल असे त्यांनी सांगितले.
......