पुणे : रेटिनोपथी आॅफ प्रीम्यॅच्युरीटी (आर.पी.ओ.) या लवकर जन्मलेल्या व जन्मत: कमी वजन असलेल्या बालकांमध्ये आढणाऱ्या आजारामुळे दरवर्षी महाराष्ट्रात ७०० ते ८०० बालकांना अंधत्व येत असून, भारतात हे प्रमाण तीन ते साडेतीन हजार इतके आहे. या आजाराचे लवकर निदान झाल्यास व योग्य उपचार केल्यास बालकांना अंधत्व येण्यापासून वाचवता येऊ शकते. या बाबत लवकरच एक पथदर्शी उपक्रम राबविण्यात येणार असून त्याबाबतची माहिती एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालयाच्या वैद्यकीय संचालिका डॉ. सुचेता कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी एच. व्ही. देसाई हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश कापसे उपस्थित होते. लवकर जन्मलेल्या व जन्मत: कमी वजन असलेल्या बालकांमध्ये आढळणाऱ्या रेटिनोपथी आॅफ प्रीम्यॅच्युरीटी (आर.पी.ओ.) या आजाराबाबत जनजागृती व प्रतिबंध करण्यासाठी महाराष्ट्र शासन, इंग्लंड मधील कुईन एलिझाबेथ डायमंड ज्युबली ट्रस्ट व पब्लिक हेल्थ फाउंडेशन आॅफ इंडिया या दोन संस्थांच्या मदतीने तसेच एच.व्ही. देसाई नेत्र रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय तपासणी व उपचार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा उद्घाटन समारंभ २६ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता औंध येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याणमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी बोलताना डॉ. सुचेता कुलकर्णी म्हणाल्या, लवकर जन्मलेल्या व जन्मत: कमी वजन असलेल्या बालकांना आर.पी.ओ. हा आजार होण्याची शक्यता असते. या आजारामुळे कायमचे अंधत्व येऊ शकते. तसेच एकदा अंधत्व आले तर यावर कोणताही उपाय करता येत नाही. योग्य वेळी तपासणी व उपचार घेतल्यास सर्व बालकांना अंधत्वापासून वाचवता येऊ शकते. या आजाराचे योग्य वेळी निदान झाल्यास एका साध्या सोप्या लेझर उपचार पद्धतीद्वारे रेटिना हा पडदा सरकणे व त्यामुळे पुढे येणारे अंधत्व यांपासून नवजात बालकाला वाचवता येते. मात्र या आजाराचे निदान करण्यासाठी रेटिनाची विशेष तपासणी प्रशिक्षित आर.पी.ओ. तज्ज्ञांकडूनच करावी लागते. त्यामुळे योग्य वेळेत निदान केल्यास व योग्य उपचार केल्यास बालकाला अंधत्व येण्यापासून वाचवणे शक्य आहे. राजेश कापसे म्हणाले, या आजाराबाबत अनेकदा पालकांना माहिती नसते. प्रीमॅच्युअर बालक जन्मल्यानंतर एका महिन्याच्या आत निदान होऊन उपचार करणे गरजेचे असते. मात्र अनेक पालकांना या आजाराबाबत माहिती नसल्याने व वेळेत उपचार न झाल्याने अंधत्व येण्याची शक्यता असते. त्यामुळे या आजाराबात पालकांमध्ये जागृती असणे गरजेचे आहे.
नवजात बालकांमधील अंधत्व रोखणे शक्य
By admin | Published: April 24, 2017 4:59 AM