पुणे : केंद्र सरकारने १ मे पासून १८ वर्षांपुढील सर्वांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यास परवानगी दिली आहे.राज्य सरकारने देखील लसीकरणाच्या दृष्टीने तयारी सुरु केली आहे. मात्र, लोकसंख्येच्या तुलनेत लसींचा पुरवठा कसा होतो हे पाहणे देखील महत्वाचे आहे.तसेच केंद्र सरकारच्या उज्वला गॅस सबसिडी योजनेप्रमाणे आम्ही पण लसी संदर्भात नागरिकांना आवाहन करणार असून ज्यांना शक्य आहे त्यांनी स्वत: खर्च करून लस घ्यावी, गरिबांना आम्ही लस देऊ असा फॉर्म्युला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुचविला आहे.
पुण्यात विभागीय आयुक्त कार्यालयात कोरोना आढावा आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला लोकप्रतिनिधींसह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. पवार म्हणाले, लस खरेदी करण्यासाठी ग्लोबल टेंडर काढणार आहोत. टेंडरमध्ये सर्व लस कंपन्यांचा उल्लेख केला जाणार आहे. त्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. राज्यातील लसमोफत संदर्भात १ मे ला मुख्यमंत्री बोलणार आहे. लसींच्या पुरवठ्याबाबत सिरमचे अदर पुनवाला यांच्याशी मुख्यमंत्री स्वतः बोलले आहेत..
राज्यासाठी रेमडिसिविरचा कोटा कमी करण्यात आला आहे त्यासंदर्भात आम्ही केंद्रांशी बोललो आहे. जामनगरमधील ऑक्सिजनचा जो 250 मेट्रिक टनचा कोटा होता तो कमी करण्यात आला आहे. तो कमी करू नका यासंदर्भात देखील केंद्रांशी चर्चा सुरु आहे. तसेच वेगवेगळ्या ठिकाणी बंद पडलेले ऑक्सिजन प्लांट सुरू करण्यात आले आहेत. राज्यातील साखर कारखान्यांना देखील ऑक्सिजन निर्मितीबाबतच्या सूचना दिल्या आहेत. तसेच नवीन कोविड सेंटर उघडायचं असेल तर आरोग्य विभागाशी बोलूनच परवानगी दिली जाणार आहे असेही पवार यांनी यावेळी सांगितले आहे.
अजित पवारांचं अनिल देशमुख यांच्या घरावरील छापा कारवाईवर भाष्य...
अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील निवास स्थानी सीबीआयने केलेल्या कारवाईवर अजित पवार म्हणाले, या प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार चौकशी सुरू आहे. मी सकाळपासून पुण्यात आहे. माझं त्यांच्याशी बोलणं झालेले नाही.मात्र चौकशी करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत. पण अशा संस्थांनी निःपक्षपाती चौकशी करावी.