पुणे : शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या नावाखाली दलाल आपले खिसे भरत असून खऱ्या लाभार्थ्यांना लाभच मिळत नाही. शासकीय योजनांना सर्वाधिक भिती दलालांची असून डिजीटायझेशनद्वारे दलालांना व्यवस्थेमधून दूर फेकण्याचा प्रयत्न सुरु आहे. स्वयंसेवी संस्थांनी पुढे येऊन योजना यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केल्यास दलाल हद्दपार होतील असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. अनुगामी लोकराज्य महाभियान (अनुलोम) पुणे विभागातर्फे एकदिवसीय सारथ्य समाजाचे विकास मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जलतज्ञ राजेंद्र सिंह, राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, प्रधान सचिव प्रविणसिंह परदेशी, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, पिंपरी चिंचवडचे महापौर नितीन काळजे, सारंग निर्मळ, कृष्णकुमार गोयल, अतुल वझे, सारंगधर निर्मल, हर्षल मोर्डे, मयूर राजे आदी उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, समाजातील नकारात्मकता प्रकर्षाने पुढे येते. वास्तविक समाजात सकारात्मकतेचे प्रमाण अधिक आहे. सज्जन शक्ती अधिक असूनही दुर्जनांचा प्रभाव वाढलेला दिसतो. त्यामुळेच निराशेचा सूर सतत उमटत असतो. सकारात्मकता आणण्यासाठी समाजच पुढे आला पाहिजे. सरकार आपले करीत असते. परंतु, सरकारवर अवलंबून परिवर्तन होत नाही. सरकार जर सामाजिक, आर्थिक परिवर्तनाचे माध्यम ठरले असते तर गेल्या ७० वर्षात एकही गरीब, वंचित राहिला नसता. आजवर सरकार आणि अधिकाऱ्यांमध्ये आपण मालक असल्याची भावना बळावली. जनता आमच्यावर अवलंबून असल्याची मानसिकता तयार झाल्यास सरकारमध्ये अंतर पडते. योजना केवळ सरकारच्या राहतात त्या नागरिकांच्या होत नाहीत. त्यामुळे सरकारी अधिकाऱ्यांमध्ये सेवेचा भाव असणे आवश्यक असून लोकसहभाग वाढायला हवा असे फडणवीस म्हणाले. जेव्हा शासकीय अधिकारी सामान्य लोकांना जवळचे वाटू लागतील त्यावेळी समाजाच्या विकासाला आणि परिवर्तनाला सुरूवात होईल. शासकीय योजनांचा आत्मा हा लोकसहभाग हाच आहे. वेगवेगळ्या चौदा शासकीय योजना व विविध विभागांना एकत्र करून जलयुक्त शिवार अभियान सुरू करण्यात आले. लोकसहभागासह सामाजिक संस्था व व्यक्तींच्या सकारात्मक सहभागामुळे आज महाराष्ट्र दुष्काळमुक्तीकडे दमदार वाटचाल करत आहे. शास्त्रीय दृष्टीकोन समोर ठेवून शासनाने जलयुक्त शिवार अभियान राबविले. त्यासाठी जलमित्र ही संकल्पना राबविण्यात आली. या जलमित्रांनी राज्यात जलक्रांती करून दाखवली आहे. सकारात्मकतेचे हे आपल्या समोरील सर्वात मोठे उदाहरहण असल्याचे फडणवीस म्हणाले. मेळाव्याच्या निमित्ताने विविध सामाजिक संस्था, संघटना, युवक मंडळे, महिला बचत गट यांचे स्टॉल लावण्यात आले होते. अनिल माहिते यांनी प्रास्ताविक केले. अतुल वझे, महापौर मुक्ता टिळक यांनी मनोगत व्यक्त केले. तर रविंद्र दहाड यांनी आभार मानले.
डिजीटायझेशनद्वारे दलालांना व्यवस्थेमधून दूर फेकणे शक्य : देवेंद्र फडणवीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 6:13 PM
अनुगामी लोकराज्य महाभियान (अनुलोम) पुणे विभागातर्फे एकदिवसीय सारथ्य समाजाचे विकास मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
ठळक मुद्देस्वयंसेवी संस्थांनी पुढे येऊन योजना यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केल्यास दलाल हद्दपार : फडणवीसमेळाव्याच्या निमित्ताने विविध सामाजिक संस्था, महिला बचत गट यांचे लावले होते स्टॉल