पुणे : कंपनीच्या परीसरात येणाऱ्या श्वानांसाठी झटणं एका आयटी अभियंत्याला चांगलेच महागात पडले आहे. कंपनीने अभियंत्याला कामावरुन काढून टाकले असून अभियंत्याने कंपनीला आता कायदेशीर नाेटीस पाठवली आहे. तसेच कंपनीने अनेक श्वानांना इतरत्र हलविले असून त्या श्वानांना परत आणण्याची मागणी करत उद्या काही कर्मचारी आणि प्राणीप्रेमी एकत्र जमणार आहेत.
विक्रम शिबाद हे पुण्यातील हिंजवडी भागातील इन्फाेसिस या आयटी कंपनीत कामाला हाेते. ते आणि त्यांचे सहकारी तेथील भटक्या श्वानांना खायला देत असत तसेच त्यांचा संभाळ देखील करत हाेते. कंपनीच्या परिसरातील सुरक्षारक्षकांकडून या श्वानांना अनेकदा मारत असत. तसेच त्यांना कंपनीच्या परिसरात येण्यापासून मज्जाव करत हाेते. हे श्वान गेल्या अनेक वर्षांपासून कंपनीच्या परिसरातच राहत हाेते. सुरक्षारक्षक श्वानांना सातत्याने मारहाण करत असल्याने शिबाद यांनी गेल्या वर्षी ऑक्टाेबरमध्ये पशुसंवर्धन अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली हाेती. एके दिवशी रात्री 3 च्या सुमारास शिबाद यांना त्यांच्या सहकाऱ्यांचा फाेन आला की कंपनीचे सुरक्षारक्षक कंपनीच्या परिसरातील एका श्वानाला गेटच्या आत येऊ देत नाहीये. बाहेर इतर श्वानांचा जमाव असून ते या श्वानाला जखमी करण्याची शक्यता आहे. त्यावेळी शिबाद यांनी सुरक्षा रक्षकाला श्वानाला आत येऊ देण्याची विनंती केली परंतु त्यांनी ती नाकारली तसेच शिबाद यांचा आयटी क्रमांक मागून घेत फाेन बंद केला. याप्रकरणी सुरक्षा रक्षकाने कंपनीकडे शिबाद यांच्याविराेधात तक्रार केली. शिबाद हे फाेनवर धमकावत असल्याचे तसेच रुडली बाेलत असल्याचे सुरक्षारक्षकाचे म्हणणे हाेते. त्यावर शिबाद यांना कंपनीने बाेलावून घेत याबाबत विचारले असता आपण सुरक्षारक्षकाला धमकावले नसून याबाबतचे रेकार्डिंग तुम्ही ऐकू शकता असे शिबाद यांनी सांगितले. त्यावर फाेन रेकार्ड हे कंपनीच्या काेड ऑफ कंडक्टच्या विराेधात असल्याचे कंपनीने म्हणत त्यांना नाेटीस दिली.
गेल्या काही महिन्यांपासून कंपनीने परिसरातील अनेक कुत्र्यांना इतरत्र हलविले आहे. त्याबाबत शिबाद यांनी पाेलिसांकडे तक्रार देखील केली हाेती. याचाच राग ठेवून शिबाद हे कंपनीतील इतर कर्मचाऱ्यांना सुरक्षारक्षकांच्या विराेधात धमकावत असल्याचा दावा कंपनीने केला. तसेच शिबाद यांना 22 एप्रिल राेजी कामावरुन काढून टाकले. याविराेधात शिबाद यांनी कंपनीला कायदेशीर नाेटीस पाठवली असून त्यांना केलेले बडतर्फ मागे घेऊन त्याचे रुपांतर राजीनाम्यात करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच कंपनीने ज्या श्वानांना इतरत्र हलविले आहे त्यांना तातडीने परत आणण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. त्यासाठी उद्या कंपनीचे काही कर्मचारी आणि प्राणीप्रेमी एकत्र जमणार आहेत.