IT Raid: आयकर विभागाच्या कारवाईवर अजित पवारांची पुण्यात प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2021 01:31 PM2021-10-08T13:31:16+5:302021-10-08T13:33:59+5:30
पुणे जिल्ह्यातील दौंड शुगर्स, अहमदनगर जिल्ह्यातील अंबालिका, सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर आणि नंदुरबार जिल्ह्यातील संस्थेवर कारवाई सुरूच आहे. (ajit pawar on it raid pune, income tax raid pune)
पुणे: सध्या पाहूणे वेगवेगळ्या घरात आहेत. त्यांचे काम सुरू आहे. ते गेल्यानंतर मला जे बोलायचे ते मी बोलेने, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे दौऱ्यावर असताना माध्यमांशी बोलताना दिली. नियमाने जे असेल ते सगळे जनेतेच्या समोर येईल यामध्ये घाबरायचे कारण नाही. त्यावेळेस 'दूध का दूध, पाणी का पाणी होईल' अशी प्रतिक्रिया आयकर विभागाच्या कारवाईनंतर अजित पवारांनी पुण्यात दिली.
दरम्यान आयकर विभागाने अजित पवारांच्या नातेवाईकांच्या मालमत्तेवर कारवाई सुरूच ठेवली आहे. कालपासून जिथे कारवाई सुरू होती तिथे आयकर विभागाचे अधिकारी आणि आणि सुरक्षा दलांचे जवान मुक्कामालाच होते. पुणे, अहमदनगर, सातारा आणि नंदुरबारमध्ये सलग दुसऱ्या दिवशीही चौकशी सुरूच आहे. अजित पवारांच्या पुण्यातील दोन बहिणी डॉ. रजनी इंदुलकर आणि आणि नीता पाटील यांच्या मालमत्तांवर आजही छापे सुरूच आहेत.
त्याचबरोबर पुणे जिल्ह्यातील दौंड शुगर्स, अहमदनगर जिल्ह्यातील अंबालिका, सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर आणि नंदुरबार जिल्ह्यातील संस्थेवर कारवाई सुरूच आहे. काल पहाटेपासून आयकर विभागाने राज्यातील अजित पवारांच्या निकटवर्तीयांच्या घरी आणि खाजगी मालमत्तांवर छापे टाकले होते.